वसई : वसई-विरार पुर्वेस तुंगारेश्वर, तिल्हेर, पेल्हार भागात असलेल्या जंगलामध्ये भूमाफीया सक्रीय झाले आहेत. सरसकट वनजमीनी बळकावून त्यावर अनधिकृत बांधकामे करण्याचा सपाटाच त्यांनी लावला आहे. या भूमाफीयांना वनखात्यातीलच कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभत असल्यामुळे भविष्यात येथील जंगलातील मौल्यवान वनस्पती नष्ट होण्याची शक्यता आहे.काही वर्षांपासून वसई विरार उपप्रदेशाच्या पूर्व भागातील वनक्षेत्र हळुहळू कमी होत आहे. अनधिकृत चाळी, दगडखाणी तसेच झोपडपट्ट्यांचे पेव फुटल्याने वनजमीनी गिळंकृत होत आहेत. तुंगारेश्वरच्या जंगलात मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पती आहेत. मात्र, जमीनी गिळंकृत करण्यासाठी होत असलेल्या वृक्षकत्तलीमध्ये हा ठेवा नष्ट होत आहे. मध्यंतरी वनविभागाने येथील नागरीकांना ये-जा करण्यासाठी असलेला मार्ग बंद करण्याचा घाट घातला होता परंतु वनजमीनी बळकावणाऱ्या भूमाफीयांना मात्र त्यांनी मोकळे रान दिले. त्यामुळे गेल्या १५ वर्षात हजारो हेक्टर वनजमीनी भूमाफीयांच्या ताब्यात गेल्या. या सर्व गैरकारभाराला वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचेच सहकार्य मिळत असल्याने भूमाफीयांची हिम्मत वाढली आहे. नालासोपारा पूर्वेस तुळींज भागात असलेल्या डोंगरावरही अनधिकृत बांधकाम दिवसेंदिवस वाढत आहे. येथे तत्कालीन नालासोपारा नगरपरिषदेने सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून वृक्षलागवड केली होती. परंतु अल्पावधीतच भूमाफीयांनी या या जंगलात वणवे लावून येथील जागा गिळंकृत केली. पूर्व भागात महामार्गालगत असलेल्या अनेक ठिकाणी वनजमीनीवर सरसकट अतिक्रमणे होत आहेत. वन जमीनीचा कारभार हा महसूल विभागाच्या अंतर्गत येत नसल्यामुळे अनधिकृत दगडखाणीही येथे उभारण्यात आल्या आहेत. मध्यंतरी शिरवली गावात अशाच एका दगडखाणीने पर्यावरणाचे सारे नियम धाब्यावर बसवत प्रचंड खडी काढली. परंतु त्या मोबदल्यात सरकारच्या तिजोरीत कोणताही महसूल जमा केलेला नाही. (प्रतिनिधी)
वसईत वनजमिनींवर अनधिकृत बांधकामे
By admin | Published: August 11, 2015 11:36 PM