जव्हार : जव्हारच्या जिल्हाधिकारी कार्यलयावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली वनविभागाच्या विरोधात व अन्य मागण्यांसाठी शुक्रवारी धडक मोर्चा काढण्यात आला आहे.
वनविभागाने वर्षानुवर्ष कसत असलेल्या वन प्लॉट धारकांवर शेती करण्यास मनाई केली असून, काही वन प्लॉट धारकांनी भुजनी केली. म्हणून गुन्हे दाखल केले आहेत. तर काही वन प्लॉट धारकांवर वन विभागाकडून कारवाईची टांगती तलवार आहे. तसेच अनेक वर्षांपासून वन प्लॉट जागेत असलेल्या झोपड्या मोडल्या तर काहींना शेतावरील घरे मोडण्याच्या नोटिसा काढण्यात आल्या आहेत. म्हणून वनप्लॉट धारक अक्र मक झाले असून, कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यलयावर धडक मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चा दरम्यान वन विभागाने मोजणी करु न दिलेल्या वनपट्ट्यांवरील कारवाई थांबवावी, वनविभागाची दडपशाही बंद करा, पेंडिंग राहिलेले वनप्लॉट दावे तातडीने मंजूर करा, वन विभागाने गोळीबाराचे दिलेले आदेश मागे घ्यावे, पावसाळ्यातही रोजगार हमीची कामे देण्यात यावी, वृद्धापकाळ योजनेची अंमलबजावणी करा, अनेक वर्षांपासून वनप्लॉटात कसत असलेली शेतीवरील कारवाई थांबवावी, अशा अनेक मागण्यांसाठी माकपाच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढण्यात आला.
माकपाच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्च्याचे नेतृत्व करण्यासाठी माकपाचे कॉ.रतन बुधर, कॉ.किसन गुजर, कॉ.किरण गहाला, कॉ. रुपेश धानवा, कॉ.यशवंत बुधर, कॉ.विजय शिंदे, सुरेश बुधर, कॉ.शिवराम बुधर, शांतीबाई खुरकुटे, पं.स.सदस्य यशवंत घाटाळ, लक्ष्मण जाधव, अन्य शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला वर्ग उपस्थित होते.