भिवंडी : मुंबई-नाशिक महामार्गालगत खारेगाव टोलनाका ते वडपे दरम्यान तालुक्यातील आठ मुख्य गावे येत असून या गावास जोडणारी इतर गावे आहेत. त्या सर्व ग्रामस्थांना नियमित रस्त्यापलीकडे जाण्यासाठी अंडर बायपास मार्ग करावा, अशी मागणी परिसरातील ५० गावांतून जोर धरू लागली आहे.या महामार्गालगतच्या गावांतील नागरिकांना रस्त्यापलीकडे जाण्या-येण्याकरिता अंडर बायपास मार्ग केले आहेत. मात्र, वडपे ते खारेगाव टोलनाकादरम्यान मुख्य आठ गावे असली तरी या गावांना जोडणारी किमान ५० छोटी-मोठी गावे आहेत. त्या गावातील ग्रामस्थांना शहरात जाण्या-येण्यासाठी रस्ते महामंडळाने कोणताही सर्व्हिस रोड अथवा अंडर बायपास ठेवलेला नाही. त्यामुळे गावात जाण्यासाठी रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांचा व दुचाकी वाहनचालकांचा अपघाती मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. सध्या खारेगाव टोलनाका ते वडपादरम्यान रस्ता रुंदीकरणाचे तसेच माणकोली, रांजनोली व वडपा येथे उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरू आहे. या गावांतील ग्रामस्थांना रस्त्यापलीकडे जाणारा वाहतुकीचा मार्ग अथवा सुविधा केलेली नाही. त्यामुळे महामार्गावरून भरधाव वेगाने जाणारी वाहने रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांना व दुचाकींना ठोकर मारून पळून जातात. तसेच झेब्रा पट्ट्यावरील वाहने व पादचाऱ्यांनादेखील ठोकर मारून पळून जाण्याच्या घटना रात्रंदिवस घडत आहेत. या सर्व घटनांमुळे ग्रामस्थांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे.
‘त्या’५० गावांसाठी अंडर बायपासची गरज
By admin | Published: July 21, 2015 4:58 AM