वसई : मागील अनेक वर्षे चुळणे गाव परिसरातील नाल्यांचे बांधकाम, पाणीसमस्या, रस्तेदुरुस्तीची कामे पालिकेला तक्रार करूनही अद्याप पूर्ण केलेली नाहीत. विशेषत: चुळणे गाव परिसरातील नैसर्गिक नाल्यावरील पूलदेखील जुना झाल्याने तो कमकुवत झाला आहे. ही सर्व रखडलेली कामे पूर्णत्वास नेण्यासाठी नुकतेच चुळणे ग्रामस्थ तथा जागृती सेवा संस्थेच्या वतीने जॅक गोम्स व शिवसेनेच्या किरण चेंदवणकर यांनी वसई-विरार महापालिका आयुक्त तथा प्रशासक गंगाथरन. डी यांना निवेदन दिले आहे.
चुळणे गाव परिसरातील नैसर्गिक नाल्यावरील ब्रिज जुना झाल्याने तो तयार करण्यासाठी पालिकेकडून मार्च २०१९ मध्येच कामाला मंजुरी मिळाली होती. मात्र,, या कामाला अद्यापही सुरुवात करण्यात आलेली नाही. याखेरीज चुळणे गावाला लागून असलेल्या कौल हेरिटेज सिटीमध्ये १० वर्षांपूर्वी बांधलेल्या जलकुंभात जराही पाणी न सोडल्याने चुळणेवासीयांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.
दरम्यान, पालिका अधिकारी यांच्याकडे याविषयी तक्रार केल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.चुळणे ते सलोली व चुळणे ते गास या रस्त्यांचे डांबरीकरण पालिकेच्या वतीने करण्यात येणार होते. यासाठी लागणारी खडी आणि माती आणून ठेवण्यात आली आहे, परंतु त्याकडे लक्ष दिले गेले नसल्याने संपूर्ण खडी रस्ताभर विखुरली आहे. येथील विकासकामांच्या रखडपट्टीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे जागृती सेवा संस्थेचे जॅक गोम्स यांनी लोकमतला सांगितले.