वसई : नालासोपारा पूर्वेस असलेल्या पालिकेच्या रुग्णालयाबाहेर बंद दुकानाच्या परिसरात एका बेवारस इसमाचा मृतदेह शनिवारी रात्रीपासूनच पडून असल्याची बाब समोर आल्याने खळबळ माजली. दरम्यान, सदर इसम भिकारी असून त्याचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन पोस्टमार्टेमसाठी पाठवला आहे.नालासोपारा पूर्वेस असलेल्या पालिका रुग्णालयाबाहेर बंद दुकानाच्या परिसरात एक अज्ञात इसम मागील आठवड्यापासून राहात होता. त्याचा चेहरा थोडा जळालेला असून त्यास एका डोळ्याने कदाचित दिसतदेखील नसावे. रविवारी सकाळी या ठिकाणी लोकांनी या इसमाचा बेवारस अवस्थेत पडलेला मृतदेह पाहिला. ही बाब बाजूलाच असलेल्या रुग्णालयातील पालिका कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली असता रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्या मृतदेहावर केवळ कपडा ठेवून तेथून पळ काढला. हे काम आमचे नाही, पोलिसांचे आहे असे त्या कर्मचाºयांनी उपस्थितांना सांगितले. या बेवारस इसमाचा मृत्यू कदाचित शनिवारी रात्रीच झाला असावा, मात्र कोरोनाच्या भीतीने ना पोलीस, ना पालिका किंवा नागरिकांपैकी कोणीही याची दखल घेतली नाही.दरम्यान, वसई-विरार पालिका हद्दीमध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. मात्र, महानगरपालिकेकडून संध्याकाळी ६ वाजता तयार केला जाणारा कोरोनासंदर्भातील अहवाल रात्री उशिरापर्यंत जाहीर होत नसल्याने स्थानिक पत्रकारांमध्येही नाराजी व्यक्त होत आहे.या मृतदेहाबाबत चौकशी केली असता सदर इसम हा भिकारी असून त्याचा कुणीच वारस पुढे न आल्यामुळे पोलिसांनीच फिर्याद नोंदवली आणि शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आला आहे, अशी माहिती तुळिंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस. पाटील यांनी दिली.
रुग्णालयाबाहेर बेवारस मृतदेहामुळे खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2020 11:51 PM