नालासोपारा (मंगेश कराळे) - वसई जनता बँकेच्या सुवर्ण महोत्सव आणि बीजेपी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत जनसंवाद कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे वसईच्या दौऱ्यावर शुक्रवारी सकाळी आले होते. विरार येथील जनसंवाद कार्यक्रमासाठी नितीन गडकरी जात असताना आगरी सेनेच्या कार्यकर्त्यांनी वसईच्या पाणी प्रश्नावरून काळे झेंडे दाखवले आहेत.
विरार पोलिसांनी याप्रकरणी दोन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी विरार पोलीस गुन्हा दाखल करणार का याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागून आहे. या घटनेप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून यापूर्वीही काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचे विरारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी लोकमतला सांगितले.
वसई विरार शहरातील जनतेला पाणी मिळत नाही, सूर्या प्रकल्पाचे पाणी तयार आहे. पण राजकारणाची पोळी भाजण्यासाठी श्रेय लाटण्यासाठी उदघाट्नास अक्षम्य दिरंगाई केली जात आहे. देशाचे केंद्रीय मंत्री एका बँकेच्या रौप्य महोत्सव कार्यक्रमाला येतात. परंतु सूर्या प्रकल्पाच्या पाणी वितरण वाहिनी तयार असताना त्याच उदघाट्न करण्यासाठी कुणालाच वेळ नाही.
लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न बाजूला ठेवून एक बँक जी स्थानिक आदिवासी भूमिपुत्रांच्या भल्यासाठी सुविद्य सुजाण ज्येष्ठ नेत्यांनी चालू केली ती वसई विरारच्या भूमाफिया, गुंड टोळीने आपल्या ताब्यात घेऊन पीएमसी बँक घोटाळ्या संबंधित चोरांच्या हातात दिली ह्या प्रकाराचा आगरी सेनेने काळे झेंडे दाखवून निषेध करत विरोध केल्याचे आगरी सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील यांनी सांगितले.