- अनिरुद्ध पाटील
डहाणू/बोर्डी : डहाणूतील उपचार व पुनर्वसन केंद्रात दाखल केल्या जाणाऱ्या कासवांना या पुढे युनिक आयडेंटिटी कोड (मायक्रोचिप्स) लावली जाणार आहे. शुक्रवार, 31 ऑगस्ट रोजी दोन कासवांवर पशुवैद्य दिनेश विन्हेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मायक्रोचिप्स लावल्यानंतर सिने कलावंत पूजा सावंत यांच्या उपस्थितीत डहाणू समुद्रात सोडण्यात आले. मराठी सिनेअभनेत्री पूजा सावंतने शुक्रवार दुपारी या केंद्राला भेट देऊन जखमी कासवांची माहिती घेतली. त्यानंतर तिने कासवांकरिता काम करणाऱ्या प्राणीमित्र संस्थेच्या सदस्यांशी संवाद साधला. पशुवैद्य डॉ. दिनेश विन्हेरकर यांनी त्यांना दोन कासवावर पहिल्यांदाच बसविण्यात आलेल्या युनिट आयडेंटिटी कोड याबद्दल माहिती दिली. तिच्या उपस्थितीत त्या कासवांना दुपारी समुद्रात सोडण्यात आले. भारतातील हे पहिले केंद्र डहाणूतील पारनाका येथील उप वन संरक्षक कार्यालयाच्या आवारात आहे. हा विभाग आणि वाईल्डलाईफ कन्झर्वेशन अँड एनिमल वेल्फेअर असोसिएशन संयुक्तरित्या चालविते. येथे या पुढे कासवाला किनाऱ्यावरून पुनर्वसन केंद्रात आणल्यानंतर तत्काळ मायक्रोचिप्स बसविण्यात येणार आहे. या बाबत वन विभागाने परवानगी दिली. कासव कोणत्या भागातून आणले, ते ठिकाण, त्याला घेऊन येणाऱ्यांची माहिती, केलेले उपचार याची नोंद नेहमी प्रमाणेच घेण्यात येईल. त्याला कोणत्या किनाऱ्यावर, कधी सोडले ही नोंद येथे ठेवण्यात येते. त्यामुळे तेच कासव पुन्हा सापडल्यावर त्याची नेमकी ओळख या मायक्रोचिप्सच्या साह्याने मिळू शकेल असे कासवांवर उपचार करणारे पशुवैद्य दिनेश विन्हेरकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. हा युनिक डिव्हाईस असून ही चिप्स तांदळाच्या दाण्याएवढी आहे. त्याला इंजेक्शनच्या सिरिंजद्वारे कासवाच्या कवचाखालच्या त्वचेत बसविण्यात येते. विशेष म्हणजे ती आयुष्यभर त्याच्यासह राहू शकते. त्याला समुद्रात सोडल्यानंतर, कालांतराने जर तेच कासव पुन्हा आढळून आल्यास रीडर युनिटद्वारे स्कॅनरने मायक्रोचिप्सचा कोड मॅच झाल्यास या माध्यमातू ठोस ओळख पटविता येते. भारतात कासवांच्या बाबतीत पहिल्यांदाच या आधुनिक साधनाचा वापर होत आहे. डहाणू तसेच महाराष्ट्र राज्यकरिता ही अभिमानाची बाब असल्याचे या प्राणीमित्र संस्थेचे संस्थापक धवल कंसारा म्हणाले.
" प्रतिवर्षी किनाऱ्यावर कासवं आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे युनिक आयडेंटिटी कोड (मायक्रोचिप्स) लावून समुद्रात सोडलेले कासव पुन्हा आढळल्यास त्याची ओळख पाठवण्यास मदत होईल. त्याचा फायदा त्याच्यावरील उपचार आणि अभ्यासाकरिता होईल."
- डॉ. दिनेश विन्हेरकर (कासवांवर उपचार करणारे, पशुवैद्य)