अनिरुद्ध पाटील बोर्डी : वाढवण गावात पक्षी निरीक्षण करणाऱ्या ग्रुपला नवरंग पक्षाचा किलिबलाट ऐकू आला, त्यांनी त्याचा मागोवा घेतल्यानंतर येथे हा पक्षी विणीच्या हंगामाकरिता दाखल झाल्याचे संकेत मिळाल्याने पक्षी निरीक्षणाकरिता ही पर्वणी ठरल्याने त्याच्यात आनंद संचारला आहे.
इंडियन पिटा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नवरंग पक्षाचा विणीचा हंगाम मे ते ऑगस्ट हा असतो. या पक्षाची अन्य मराठी नावे बिहरा पाखरू, बिहरा, बंदी, खाटिक, गोळफा, पाऊसपेव, पाचापिल अशी सुद्धा आहेत. या पक्षाचे नर आणि मादी दिसायला सारखेच असून त्याचे निळा, हिरवा, काळा, पांढरा, तांबडा हे भडक रंग प्रामुख्याने असतात. हा पक्षी आकारमानाने मैनेएवढा असून भुंड्या शेपटीचा आहे. त्याचा पोटाखालचा व शेपटीखालचा रंग किरिमजी असतो. नवरंग पक्षी उडताना पंखांच्या टोकावर ठळक पांढरे ठिपके दिसतात. झाडांचे मूळ, काड्या यापासून बनविलेल्या घरट्यात पक्ष्याची मादी चार ते सहा अंडी देते. विविध प्रकारचे कीटक हे नवरंगाचे खाद्य आहे. तो झुडपी जंगलात राहणे अधिक पसंत करतो, शिवाय बहुतेक वेळ जमिनीवर घालवतो. व्हीट ट्यू असा आवाज सकाळ संध्याकाळ ऐकू येतो. हा ढगाळ वातावरणात दिवसभर असा आवाज काढत असल्याची माहिती चिंचणी गावातील पक्षी निरीक्षक भावेश बाबरे यांनी शनिवारी लोकमतला दिली.
फोटोग्राफर्स ब्लॉगयाचा मुख्य उद्देश नवीन छायाचित्रकाराना फोटोग्राफीच्या नवीन तांत्रिक गोष्टींची माहिती करून देणे आणि माहिती व अनुभवाचे शेअरिंग करणे हा आहे. या माध्यमातून छायाचित्रकारांचा समूह वाढवण्यास मदत होते. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील नावाजलेल्या छायाचित्रकारांचे मार्गदर्शन या माध्यमातून मिळत असते. त्यासाठीं मुंबई, पुणे आणि नाशिक या तीन विभागात वर्कशॉप, फोटोग्राफी प्रदर्शन भरवले जातात.ठाणे ते डहाणू या भागासाठी सचिन कुलकर्णी ,भावेश बाबरे आणि शैलेश आंब्रे हे कार्यरत आहेत. चिंचणी आणि परिसरातील गावांमधील युवा फोटोग्राफर्सना हे तंत्र वाढवण समुद्रकिनारी सुरू बागेत शिकवत असतांना या पक्षाचे दर्शन घडले. या किनाºयावर अनेक जीवांचा अधिवास आहे. त्यामुळे या बागेत पर्यटकांचा अतिहस्तक्षेप थांबविणे गरजेचे आहे.