(मंगेश कराळे) नालासोपारा : गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलीस अधिकारी आणि त्यांच्या टीमने दुचाकी चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला पकडून त्यांच्याकडून १३ गुन्ह्यांची उघड करून बारा चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्याची माहिती बुधवारी पत्रकार परिषदेत गुन्हे विभागाचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी दिली आहे.
मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयांच्या स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने त्यांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांनी दुचाकी चोरींचा आढावा घेवून दुचाकी चोरणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेवून गुन्ह्यांचा उलगडा करण्याचे आदेश दिलेले आहे. गुन्हे दोनच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुचाकी चोरी झालेल्या ठिकाणांना भेट देऊन घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज मिळवले. त्यावर अथक परिश्रम घेऊन अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या आरोपींची माहिती मिळवली.
आरोपी आनंद ओझा (२५) आणि एक १६ वर्षीय अल्पवयीन आरोपी यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यांनी विरार, वालीव, आचोळे, माणिकपूर, काशीमिरा, दहिसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १२ दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले. चोरीच्या दुचाकी गुजरात राज्यातील सोनगड याठिकाणी विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर धीरज ओझा (२१) आणि कौशिक मराठे (२०) यादोघांना सोनगड येथून ताब्यात घेतले. आरोपींकडून ७ लाख ५५ हजारांच्या १२ दुचाकी जप्त केल्या आहेत.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) अमोल मांडवे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा वसई युनिट दोनचे पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, सहाय्यक फौजदार रमेश भोसले, संजय नवले, पोलीस हवालदार चंदन मोरे, सचिन पाटील, जगदीश गोवारी, रमेश आलदर, सुधीर नरळे, प्रशांतकुमार ठाकुर, अमोल कोरे यांनी केली आहे.