डहाणू : लाखो लोकांची तहान भागविणाऱ्या डहाणू तालुक्यातील साखरा धरणापासून अवघ्या २५० ते ३०० मीटर अंतरावर अज्ञात टँकरमधून घातक रसायन रस्त्यालगत टाकल्याचे समोर आले आहे.
वाणगावजवळ असलेले साखरा धरण तालुक्यातील सुमारे २९ गावांना पाणीपुरवठा करणारे महत्त्वाचे धरण आहे. डहाणू नगर परिषद, वाणगाव, चिंचणी यासह लाखो लोकांना या धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र धरणापासून काही अंतरावर टँकरमधून घातक रसायन रस्त्यावर सोडल्याने त्याची दुर्गंधी सर्वत्र पसरली आहे.
धरणालगतच वाणगाव-चारोटीकडे जाणाºया रस्त्यावर सुमारे एक किलोमीटर परिसरात अवैधपणे टँकरद्वारे हे रसायन सोडले आहे. त्यामुळे रस्त्यालगत असलेली झाडेझुडपे जळून गेली आहेत. तसेच रसायनाची दुर्गंधी वातावरणात पसरल्याने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. या मार्गावरून प्रवास करणारे वाहनचालक, प्रवासी, ग्रामस्थ, विद्यार्थी यांनादेखील त्याचा त्रास होत आहे.
हे घातक केमिकल रात्रीच्या सुमारास टाकण्यात आल्याने ते कोणी टाकले हे समजू शकलेले नाही. तरीही बाजूलाच असलेल्या धरण परिसरात रसायन टाकल्याने ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जात आहे. लाखो लोकांना पाणीपुरवठा करणारे या धरणाची सुरक्षाव्यवस्था यानिमित्ताने ऐरणीवर आली आहे. या घटनेची सखोल चौकशी व्हावी व संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. संबंधित प्रशासन याबाबत कोणती कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.