पारोळ : वसई-विरारमधील कोरोनाविरोधातील लढाई अद्याप संपलेली नाही. त्यामुळे कोरोनाचे भय संपवण्यासाठी निदान आणखी काही काळ वसईकरांना या महामारीविरोधात लढायचे आहे. दिवाळीनंतर कोरोनाचा आलेख झपाट्याने खाली आल्यानंतर आपण कोरोनाला हरवले, असा नागरिकांचा समज होणे हीच खरी बेफिकिरी ठरली आहे. दरम्यान, विनामास्क फेरीवाले आणि काही नागरिकांच्या बेफिकिरीमुळे दिवसेंदिवस वसई-विरार महापालिकेमध्ये कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत असल्याने दुसऱ्या लाटेची भीती व्यक्त होत आहे.दहा महिन्यांपासून ठप्प असलेली रेल्वेसेवा, ठप्प असलेल्या बाजारपेठा आता सुरू झालेल्या आहेत. सर्व काही सुरू झाल्यानंतर कोरोनाला पुन्हा एकदा आमंत्रण दिले गेले आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता अजूनही वसई-विरारमधील भीती संपलेली नाही. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात ज्या आर्थिक अडचणींना वसईकरांना सामोरे जावे लागले, त्या व्यथा पुन्हा कोरोनाच्या निमित्ताने उफाळून वर येतात की काय, अशी भीती हातावर पोट असलेल्या अनेकांच्या मनात उमटू लागली आहे. यात कोरोनाला आमंत्रण देण्यासाठी विनामास्क भटकणारे नागरिक आणि फेरीवाले यांचे योगदान मोठे असणार आहे.वसई-विरार पालिका परिसरात फेरीवाल्यांनी पुन्हा धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. फेरीवाले कोरोना नियमांचे पालन करीत नसल्याने तसेच नागरिकदेखील बेफिकीरपणे वागत असल्याने कोरोनाचा आलेख झपाट्याने वाढत आहे. पोलीस आणि महापालिका प्रशासनाने फेरीवाल्यांच्या सुळसुळाटावर लक्ष केंद्रित करून दंडात्मक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.वसई पालिका हद्दीत कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून शनिवारी ४० नवीन रुग्ण आढळले आहेत. सध्या ४३४ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. पालिका हद्दीत पुन्हा परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. फेरीवाल्यांचा तसेच नागरिकांचा विनामास्क वावर असल्याने कोरोनाचा धोका वाढत आहे.
आर्थिक संबंधांमुळे कारवाई नाही?- काही पालिका अधिकारी-कर्मचारी आर्थिक संबंधांमुळे या फेरीवाल्यांवर कोणतीही कारवाई करीत नसल्याने ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहेत. - सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसून येते. वसईत आठवडा बाजारांत होत असलेली गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा उडत असलेला फज्जा यामुळे कोरोनाला आमंत्रणच मिळत आहे.