डहाणू/बोर्डी : खेड्यातील निसर्ग शेती आणि शाश्वत जीवनाच्या ओढीने मुंबई शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी नरपड गाव गाठूनग्रामीण जीवनाचा अनुभव घेतला. पहिल्यांदाच त्यांनी शेतात भात लावणीचे काम करून वनभोजनाचाही आनंद लुटला.
मुंबईस्थित पर्यावरण तज्ज्ञ अॅड. गिरीश राऊत यांच्याकडून जागतिक तापमान वाढ आणि निसर्ग शेती यांविषयीची माहिती बनसोडे सरांच्या माध्यमातून मालाड येथील दालमिया महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मिळाली. खेड्यातील जीवन पाहण्यासाठी दहा विद्यार्थ्यांचा गट तालुक्यातील नरपड गावात आला. त्यांनी येथील पर्यावरण प्रेमी आणि निसर्गशेतीचे पुरस्कर्ते कुंदन राऊत यांच्या शिवाराला भेट दिली. या परिसरातील शेती व बागायतींची वैशिष्ट आणि यापूर्वी येथे आढळलेल्या बिबट्या, मोर, रानडुक्कर, हायना अशा पशुपक्षांचा वावर आदींची माहिती या विद्यार्थ्यांना देण्यात आली.
काही वेळााने बांधावरून भाताच्या रोपवाटिकेतून रोपांची खणणी करण्याचे प्रात्यक्षित आदिवासी मजुरांनी दाखवल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यास सांगण्यात आले. मात्र, आयुष्यातील हा पहिलाच अनुभव असल्याने हे तंत्र शिकताना त्यांना सुरुवातीला झगडावे लागले. त्यानंतर त्यांनी वन भोजनाचा आनंदही लुटला. दरम्यान या विद्यार्थ्यांना शिवारात अनवाणी येताना काटेकुटे, चिखल,साप इ. भीती वाटली होती. परंतु काही वेळातच हा मऊ चिखल तुडवताना आलेला आनंद अवर्णनीय होता. यापुढेही गवत व भात कापणी, झोडणी अशी कामे करण्यासह येथील चिकू वाडीतील कामाचा अनुभव, झाडावर चढणे याकरिता पुन्हा परतणार असल्याचा विश्वास व्यक्त करताना, खेड्यातील शेतीची मौज लुटण्यास शहरी मित्रांना प्रोत्साहित करणार असल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले.
पर्यावरण तज्ञ अॅड. गिरीश राऊत निसर्ग शेती आणि शाश्वत जीवन याविषयी तरु णांना प्रेरणा देण्याचे काम करीत आहेत. त्यामुळेच या विद्यार्थ्यांनी शिवारात उतरून काम केले. त्यांना खेड्यात येऊन काम करायचे आहे हे ऐकून सकारात्मक वाटले. - कुंदन राऊत (शेतकरी, नरपड गाव)