हितेन नाईक -
पालघर : समुद्रातील माशांचे प्रमाण घटल्याने मासेमारीला जाणाऱ्या बोटी १० ते १५ दिवसांनी मासेमारी करून बंदरात येऊ लागल्या. त्यामुळे पकडलेले मासे अधिक दिवस ताजे राहावेत म्हणून माशांवर ‘सोडियम मेटा बाय सल्फाईड’ नावाच्या जंतुनाशक पावडरचा वापर केला जात आहे. हा वापर जीवघेणा ठरत आहे. याच्या वापराबाबत योग्य प्रशिक्षण नसल्याने भाऊच्या धक्क्यावर एका ट्रॉलरच्या खणातून मासे बाहेर काढण्यासाठी उतरलेल्या खलाशांपैकी दोघांच्या फुप्फुसात सल्फ्युरिक ॲसिड निर्माण होऊन ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्याने गुदमरून मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली. समुद्रात जाणाऱ्या बोटी, ट्रॉलर दोन ते पाच दिवसांनी मासे पकडून बंदरात यायच्या; मात्र दिवसेंदिवस पर्ससीन, एलईडी, डोलनेट आदी प्रगत आणि विनाशकारी मासेमारी पद्धतीमुळे समुद्रातील मत्स्य उत्पादन घटू लागल्याने आता बारा ते पंधरा दिवसांची मासेमारी करून बोटी परत येत आहेत.
शवविच्छेदन रिपोर्टनंतरच कळेल खरे कारण- २६ डिसेंबर रोजी भाऊच्या धक्क्यावरील श्रीनिवास यादव आणि नागा डॉन संजय या दोघांचा गुदमरून मृत्यू झाला होता. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. - खणात उतरलेल्या सहा कामगारांच्या फुप्फुसात श्वासोच्छ्वासादरम्यान सल्फर डायऑक्साईड हा विषारी वायू जाऊन त्यांचा गुदमरून मृत्यू झाला असावा, अशी शंका रसायनशास्त्राचे प्रा. सुहास जनवाडकर यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली. - येलो गेट पोलिसांना या मृत्यूप्रकरणी शवविच्छेदन रिपोर्ट आल्यानंतरच खरे कळेल, असे ते म्हणाले.