जगदीश भोवड -
पालघर : जिल्ह्याची एकूण लोकसंख्या अंदाजे ३० लाखांच्या घरात आहे, मात्र आजवर जिल्ह्यात केवळ २ लाख ७३ हजार ३०२ एवढेच लसीकरण झालेले आहे. एकंदर कासवगतीने होत असलेले लसीकरण पाहता नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीची भावना पसरलेली आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यांत असलेल्या लसीकरण केंद्रांवर नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करताना दिसत असून अनेकांना लसीअभावी परत फिरावे लागत आहे.पालघर जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ग्रामीण भागातही रुग्ण आढळत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. पूर्वी गावखेड्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव नव्हता. मात्र आता गावागावांमध्येही रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे सुरुवातीच्या काळात कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेण्यासाठी फारसे उत्सुक नसलेले अनेक आता मात्र लसीकरण केंद्रांवर गर्दी करताना दिसत आहेत. पालघर जिल्ह्याच्या अनेक भागांत अद्यापही लसीकरणाला म्हणावा तसा वेग आलेला नाही. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना दुसरीकडे लसीकरण वेळत होत नसल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दुसरीकडे लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करताना कुणीही कुठेही जाऊन लस घेऊ शकतो, अशी सोय असल्यामुळे पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागांतील केंद्रांवर शहरी भागातील नागरिक लसीकरणासाठी येत असल्याचेही दिसून आले आहे. जव्हार, विक्रमगड, वाडा आदी तालुक्यांतील ग्रामीण भागांतील लसीकरण केंद्रांवर बाहेरील लोकांनीच गर्दी केल्याचे दिसून आल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याचेही पाहावयास मिळाले.
१८ वर्षांपुढील नागरिकांमुळे ज्येष्ठांचे दुसरे डोस रखडलेराज्यात १८ वर्षांपुढील नागरिकांना १ मे पासून लसीकरण सुरू करण्यात आल्यामुळे अनेक लसीकरण केंद्रांवर गर्दी होत आहे. यामुळे पहिला डोस घेतलेल्या ४५ वर्षांवरील अनेक नागरिकांना दुसरा डोस घेण्यात अडचणी निर्माण होत आहेत. तसेच ग्रामीण भागातील अनेकांना मोबाईलवर रजिस्ट्रेशन करता येत नसल्याने तेही लसीकरण केंद्रांवर जाऊन गर्दी पाहून परत फिरत आहेत.
लसीअभावी काही सेंटर बंदजिल्ह्याच्या अनेक भागांतून लसीकरणाबाबत तक्रारी येत आहेत. तलासरीसह काही तालुक्यांमधील लसीकरण केंद्रांवर लसीचा साठा नसल्याने लसीकरण बंद करावे लागले आहे. तसेच अन्यही भागांत घडत आहे. त्यामुळे सकाळपासून केंद्रावर गर्दी करणाऱ्या नागरिकांना लस न मिळाल्याने परत फिरावे लागत आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.
लसीकरण दहापासून, गर्दी पहाटेपासूनचकोरोनापासून बचाव व्हावा यासाठी लसीकरण अत्यंत आवश्यक असल्याने अनेक लोक पहाटेच लसीकरण केंद्र गाठतात आणि लाईनमध्ये थांबतात. मात्र सरकारी कर्मचारी सकाळी नऊ-साडेनऊनंतर येत असल्याने प्रत्यक्षात लसीकरण सकाळी १० वाजल्यापासून सुरू होते. त्यामुळे नागरिकांना चार-पाच तास रांगेत उभे राहावे लागते.
मी कुडूस येथील लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी सकाळच्या सुमारास गेलो होतो, परंतु तेथे प्रचंड गर्दी होऊन वादावादी झाली. शेवटी पोलिसांना बोलावले. त्यामुळे मला लस न घेताच रिकाम्या हाताने परत फिरावे लागले.-अनिल पाटील, कुडूस
वाड्यातील लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी गेलाे असता माझ्या मोबाईलवरील लिंग ओपन न झाल्याने मला लस मिळू शकली नाही. - शरद नगर, वाडा
वाडा शहरातील पांडुरंग जावजी हायस्कूलच्या लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी सकाळी आणि दुपारी दोन वेळा गेली दोन्ही वेळा तुमच्या मोबाईलमधील लिंग ओपन होत नसल्याचे कारण पुढे करून मला दोन वेळा घरी परतावे लागले.- सोनू भोईर, गांधरे