वाडा- संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या वाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीत राज्याचे आदिवासी विकास मंत्री व पालकमंत्री विष्णू सावरा यांना जोरदार धक्का देत शिवसेनेने नगरपंचायतीवर भगवा फडकवला आहे. शिवसेनेच्या गीतांजली कोळेकर यांनी 3 हजार 119 मते मिळवून सुमारे 442 मतांधिक्क्याने सावरा यांची कन्या निशा सावरा हिचा दारूण पराभव केला आहे. भाजपाने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. मात्र मतदारांनी सावरा यांना झिडकारल्याचे स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत शिवसेना व भाजप प्रत्येकी सहा जागांवर विजयी झाले असून काँग्रेस दोन, बविआ एक, रिपब्लिकन पक्ष एक तर राष्ट्रवादी काँग्रेस एक जागेवर विजयी झाले आहेत.
वाडा नगरपंचायतीच्या आज झालेल्या मतमोजणीत धक्कादायक निकाल लागला असून शिवसेनेच्या गीतांजली कोळेकर या बहुमताने विजयी झाल्या आहेत. त्यांना 3 हजार 119 मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपच्या निशा सावरा यांना 2 हजार 677 मते मिळवून त्या 442 मतांनी पराभूत झाल्या. बहुजन विकास आघाडीच्या अमृता मोरे यांना 1 हजार 105 तर काँग्रेसच्या सायली पाटील यांना 839 मते मिळवून त्या चौथ्या क्रमांकावर फेकल्या गेल्या. प्रभाग क्रमांक 1 मध्ये भाजपचे रामचंद्र भोईर हे विजयी झाले आहेत. त्यांना 243 मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेनेचे रविंद्र कामडी यांना 149 मते मिळाली. प्रभाग क्रमांक दोन मधून भाजपचे अरूण खुलात हे विजयी झाले आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे संजय तरे हे पराभूत झाले. प्रभाग क्रमांक 3 मधून भाजपचे वैभव भोपातराव यांनी शिवसेनेचे श्रीकांत आंबवणे यांचा अवघ्या आठ मतांनी पराभव केला.
प्रभाग क्रमांक 4 मधून शिवसेनेच्या नयना चौधरी यांनी भाजपच्या कविता गोतारणे यांचा पराभव केला आहे. प्रभाग क्रमांक पाच मधून भाजपच्या अंजनी पाटील ह्या विजयी झाल्या आहेत. त्यांनी मनसेच्या ताराबाई डेंगाणे यांचा 47 मतांनी पराभव केला आहे. प्रभाग क्रमांक 6 मधून भाजपच्या रिमा गंधे यांनी शिवसेनेच्या रश्मी गंधे यांचा पराभव केला आहे. प्रभाग क्रमांक सात मधून शिवसेनेचे संदीप गणोरे विजयी झाले असून त्यांनी बविआचे देवेंद्र भानुशाली यांचा पराभव केला आहे. प्रभाग क्रमांक 8 मधून शिवसेनेच्या शुभांगी धानवा यांनी 170 मते मिळवून भाजपच्या अश्विनी डोंगरे यांचा 57 मतांनी पराभव केला. प्रभाग क्रमांक 9 मध्ये बविआ चे वसिम शेख निवडून आले आहेत.
संपूर्ण वाडा शहराचे लक्ष लागून राहिलेल्या प्रभाग क्रमांक 10 मधून भाजपाचे मनिष देहेरकर हे निवडून आले आहेत. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी काँग्रेसचे विकास पाटील यांचा 108 मतांनी दारूण पराभव केला. या प्रभागात सर्वात जास्त म्हणजेच 10 उमेदवार रिंगणात होते. प्रभाग क्रमांक 11 मध्ये शिवसेनेच्या जागृती काळण , प्रभाग क्रमांक 12 काँग्रेसच्या भारती सपाटे, प्रभाग क्रमांक 13 शिवसेनेच्या उमिॅला पाटील , प्रभाग क्रमांक 14 रिपब्लिकन पक्षाचे रामचंद्र जाधव, प्रभाग 15 काँग्रेसच्या विशाखा पाटील, प्रभाग 16 मध्ये शिवसेनेच्या वर्षा गोळे तर प्रभाग क्रमांक 17 मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुचिता पाटील या विजयी झाल्या आहेत.
महिला राज वाडा नगरपंचायतीच्या एकूण सतरा नगरसेवक व एका नगराध्यक्ष पदाच्या झालेल्या निवडणुकीत अकरा महिला उमेदवार निवडून आल्या असून अवघ्या सात जागांवर पुरुष उमेदवार निवडून आल्याने व नगरपंचायतीवर ख-या अर्थाने महिला राज आल आहे.
काँग्रेसचा पाठिंबा या नगरपंचायतीत काँग्रेसचे दोन नगरसेवक निवडून आले असून शिवसेनेला काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा असल्याचे तालुका अध्यक्ष दिलीप पाटील व शहर अध्यक्ष सुशील पातकर यांनी जाहीर केले.