निखिल मेस्त्री ।नंडोरे : पाऊस सुरु झाला की, सर्वांना वेध लागतात ते वर्षासहलीचे. निसर्गाच्या कुशीतून वाहणारे धबधबे, डोंगरांवर ट्रेकिंग, डॅमवर मौजमस्ती म्हणजे एक पर्वणीच असते. पालघरमधील वाघोबा खिंडीतील धबधबाही दणदणीत कोसळू लागल्याने हा परिसर पर्यटकांनी फुलून जाऊ लागला आहे.मनोरहून पालघरकडे येतांना वाघोबा खिंड लागते. पावसाळ्यात रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या हिरवीगार डोंगर रांगा व वरून पावसाचा मारा. अशा वातावरणात बाइक रायडींग करीत या परिसरातून जाणे ही बाईक वरून फिरणाºयांना पर्वणीच असते. ही सफर म्हणजे शरीराला आणि मनाला रिफ्रेश व चीअरफूल करणारी ट्रीट असते.असे ती एन्जॉय करणारे आनंदयात्री म्हणतात.खिंडीतील वाघोबा देवस्थान तर प्रसिद्धच आहे. कोणीही पर्यटक आले की, या मंदिरात गेल्याशिवाय राहत नाही. आसपासची हिरवाई अनुभवत असतांना आपल्या नजरेला माकडांच्या झुंडी पडतात.त्यांच्या लीला पाहणे हा देखील एक वेगळाच आनंद असतो. या परिसरात पाच धबधबे आहेत. डोंगर व शिळांमधून वाटा काढत निघणारे व उंच सखल भागातून झेपावणारे धबधबे अंगा- खांद्यावर घेण्यासाठी पर्यटक भरभरून येत असतात.येतांना सूर्या नदीवरील मासवण डॅम, पुढे वाघोबा खिंड, याच रस्त्याने पुढे जाऊन पालघर मार्गे केळवा बीच, शिरगाव बीच अनुभवणे हा तर एक अप्रतिम अनुभव आहे. मुंबईहून अगदी जवळ असल्याने या ठिकाणी पर्यटकांचा ओघ सतत वाढतोच आहे. मुंबई किंवा गुजरातहून ट्रेनने पालघर येथे येता येते. तसेच रस्त्याने यायचे झाले तर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मनोर मस्तान नाका येथून पालघरच्या दिशेने जाणाºया रस्त्याला लागले की, ही सर्व ठिकाणे अगदी सहज गवसतात. कारण ती रस्त्यालगतच आहेत.
वाघोबा खिंड फुलली पर्यटकांनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 1:40 AM