वसई : शब्दवेल साहित्य प्रतिष्ठानच्या वतीने वसई येथे चौथ्या श्रीमंत नरवीर चिमाजी अप्पा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. माणगाव येथील प्रेरणा ग्रुपची संकल्पना असलेली पर्यावरणाची मंगळागौर हा सांस्कृतिक कार्यक्रम या संमेलनाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.ज्येष्ठ साहित्यिका उर्मिला पवार या संमेलनाच्या उद्घाटक आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री, गायिका कट्यार फेम फैय्याज शेख संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणार आहेत, अशी माहिती शब्दवेलच्या अध्यक्षा डॉ. पल्लवी बनसोडे-परुळेकर यांनी दिली. वसई पारनाका येथील काँग्रेस भवनाच्या वर्तक सभागृहात २६ नोव्हेंबरला हे संमेलन भरणार आहे. वसई विरार महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती भारती देशमुख स्वागताध्यक्षा आहेत. महापौर प्रवीणा ठाकूर, पर्यावरण तज्ञ डॉ. नंदकुमार मोघे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. लोककवी प्रशांत मोरे कवी संमेलनाचे अध्यक्ष असणार आहेत. सुप्रसिद्ध निवेदक कुणाल रेगे संमेलनाचे सूत्रसंचालन करणार आहेत, अशी माहिती पल्लवी बनसोडे यांनी दिली.संमेलनात शब्दवेल स्मृतीशलाकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे. तसेच कला व साहित्य क्षेत्रात उत्कृष्ट कामागिरी केलेल्या दत्ता सामंत, काशिनाथ बावीस्कर, अॅड. रमाकांत वाघचौडे, कृष्णाबाई राठोड, शंकर मोदगेकर, सुभाष गोंधळे यांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे.>अनोखा कार्यक्रममाणगावच्या प्रेरणा ग्रुपच्या संकल्पनेतून पर्यावरणाची मंगळागौर हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून पर्यावरण विषयाला वाहिलेला हा अनोखा कार्यक्रम असणार आहे. दुपारच्या सत्रात ज्येष्ठ अभिनेत्री फैय्याज यांची मुलाखत प्रदीप देसाई घेणार आहेत. चित्रकार सुभाष गोंधळे व्यक्तीचित्रण प्रात्यक्षिक दाखवणार आहेत. काव्य संमेलनाच्या दोन सत्रांमध्ये खार येथील अनुयोग विद्यालयाचे विद्यार्थी पथनाट्य सादर करणार आहेत.
येत्या रविवारी वसईत चौथे श्रीमंत नरवीर चिमाजी अप्पा साहित्य संमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 2:44 AM