वसई : वसई किल्ला ते केळवा जंजिरा किल्ला दरम्यान होणाऱ्या श्री वज्रेश्वरी देवीच्या पालखी उत्सवाचा मान यंदा अर्नाळा गावाला प्रथमच प्रदान करण्यात आला होता. त्यानिमित्ताने संपूर्ण अर्नाळा गावात या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. २७८ व्या पालखीचा मान अर्नाळा गावाला मिळाल्यामुळे संपूर्ण गावात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळी ४ च्या सुमारास अर्नाळा गावात दाखल झालेल्या पालखीचे अर्नाळ्यातील शिवकालीन असलेल्या पेशवे बलसोडे यांच्या समाधी येथे नारळ फोडून सुभाष लेंन येथून पालखीची सुरवात करण्यात आली. येथील महिलांनी श्रीच्या पालखीचे जय्यत स्वागत करून मातेचा आशीर्वाद घेतला. सुरुवातीपासून शेकडो जण सहभागी झालेल्या पालखीत कधी हजारो लोकांचे रूपांतर झाले ते कळले नाही. लेझीमच्या तालावर होणारे लयदार नृत्य हे या पालखीच्या मिरवणुकीचे खास वैशिष्ट्ये होते.पालखी प्रथम अर्नाळा जुना कोळी वाडा येथील राम मंदिर येथे नेण्यात आली. याच मार्गे काचेरी पाडा, एस टी पाडा ,गणपती रोड, फातिमा रोड, किल्ला रोडमार्गे बंदर पाडा येथील विठ्ठल मंदिर येथे समारोप मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. या पालखी सोहळा आयोजनात अर्नाळा बंदरपाडा येथील तरुणांनी मोलाची मेहनत घेतली. तसेच हा सोहळा यशस्वी होण्यास येथील सर्वच पक्ष, संघटना, यांनी एकत्र येऊन मोलाचे सहकार्य दिले. (प्रतिनिधी)
वज्रेश्वरीच्या पालखीचा मान अर्नाळ्याला
By admin | Published: January 10, 2017 5:48 AM