जव्हार : तालुक्यात गेल्या काही वर्षापासुन विविध रस्त्यांची व पुलांची कामे रखडून होती. मात्र, त्याला सोमवारी मुहूर्त लागला. पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते रखडलेल्या विविध कामांचे भूमीपुजन करण्यात आले आहे. मात्र, या कार्याक्र माला कार्यकारी अभियंता वसईकर हे गैरहजर होते. गेल्या काही वर्षापासून डांबरी करण व मजबूतीकरण रस्ते व दसकोड गावातील पुलाचे भूमीपुजन करण्यात आले. तसेच जव्हार ते चारोटी-डहाणू रस्ता, जव्हार ते झाप-पाथर्डी रस्ता, जव्हार ते सिल्व्हासा-चालतवड रस्ता, अशा विविध कामांचे भूमीपूजन पार पाडण्यात आले. यावेळी आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, खासदार चिंतामण वनगा, जव्हार पं. स. सभापती ज्योती भोये, भाजपा आदिवासी आघाडी हरीश्चंद्र भोये, तालुका अध्यक्ष भरत सोनार, सचिन सटानेकर, तसेच बांधकाम विभागाचे अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते. तालुक्यातील मुख्य रस्त्यांची कामे व्हावी हा मुुद्दा लोकमतने लावून धरला होता. या रस्त्यांवर शेकडो अपघात झालेले असून झाप रस्त्यावर एक महिला व पुरूषाला दुचाकी अपघातात आपला जीव गमवावा लागल्याची घटना अलिकडचीच आहे. ही कामे सार्वजनिक बांधकाम विभाग जव्हारची असून यांची सर्वस्वी जबाबदारी सार्वजनीक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांची असत. मात्र, भूमीपूजन वेळी मंत्री विष्णू सवरा स्वत: उपस्थित असतांना सुध्दा कार्यकारी अभियंता वसईकर मात्र गायब होते. त्यामुळे ही कामे व्यवस्थित होतील का ? असा प्रश्न पडला आहे. (वार्ताहर)
रखडलेल्या रस्त्यांचे भूमीपुजन
By admin | Published: February 15, 2017 4:27 AM