हितेंन नाईक पालघर : तालुक्यातील मायखोप (केळवे पूर्व) येथील वंदेश राजेश पाटील या २५ वर्षीय तरुणाने अत्यंत गरिब परिस्थितीत आईच्या अपार मेहनतीच्या आणि स्वत:च्या इच्छाशक्तीच्या जोरावर अहमदाबाद येथील अंतरिक्ष अनुसंधान केंद्रात (इसरो) झेप घेतली आहे. चांद्रयान २ अवकाशात झेपावत असतांना वंदेशच्या हातात आपली इसरोमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून निवड झाल्याचा मेल आल्यानंतर त्याचा आनंद गगनात मावेनासा झाल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले.
देशाला अंतरिक्ष संशोधनातील महत्त्वपूर्ण माहिती मिळवावी माहिती तंत्रज्ञानात आपण नवनवीन क्षेत्रे पादाक्रांत करावी, यासाठी इसरोमधून देशातील अंगी गुणवत्ता आलेल्या तरुणांना इसरोच्यावतीने नवनवीन संधी उपलब्ध करून दिल्या जातात. वंदेशची सन २०१७ मध्ये हुकलेली संधी पुन्हा प्राप्त झाल्यानंतर सोडायची नाही. ही मनाशी बांधलेली पक्की खूणगाठ प्रत्यक्षात उतरविण्यात त्याला यश मिळाल्याने तो खूपच आनंदित झाला आहे. आपल्या देशाला माहिती तंत्रज्ञानबाबत स्वयंपूर्णतेकडे नेण्याबाबत आपला थोडा का होईना खारीच्या वाट्याचा हातभार लागेल या कल्पनेनेच त्याला आकाश ठेंगणे वाटू लागले आहे.
पश्चिम रेल्वेच्या केळवे रोड स्थानकाच्या पूर्वेला असलेले मायखोप या छोट्याशा गावात वंदेश आपली आई व दोन भावासह राहतो. दहा वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला. एका झोपडीत राहणाऱ्या या कुटुंबावर उदरनिर्वाहाचा मोठा गंभीर प्रश्न उभा राहिला. आर्थिक विवंचनेत सापडलेल्या आपल्या कुटुंबाचा डोलारा ढळू द्यायचा नाही ही खूणगाठ मनाशी बांधून त्याच्या आईने श्राद्ध कार्यक्र माचे सोपस्कार पूर्ण केल्यावर डोक्यावर माश्यांची टोपली आणि हातात भाजीपाला घेऊन परिसरात विक्रीच्या व्यवसाय सुरू केला. या व्यवसायातून मिळालेल्या उत्पन्नातून त्या माउलीने आपल्या तिन्ही मुलांचे शिक्षण पूर्ण केले.
वंदेश याने वाणगाव आयटीआयमधून इन्फरमेशन टेक्नॉलॉजी अॅण्ड इलेक्ट्रॉनिक सिस्टम मेंटेनन्स चा अभ्यासक्रम पूर्ण केला. एप्रिल २०१७ मध्ये ऑनलाइनवर अहमदाबाद येथील अंतरिक्ष उपयोग केंद्र (इस्त्रो) मधून टेक्निशियन भरती ची जाहिरात त्याच्या वाचनात आली. त्याला इंटरव्ह्यूसाठी बोलावण्यातही आले, मात्र दुर्दैवाने त्याची संधी हुकली.
त्याने नाराज न होता आपला पुढील अभ्यासक्र म सुरू ठेवला. त्याच्या डोळ्यापुढे आईची दिवस-रात्रीची मेहनत तरळत होती. तारापूर औद्योगिक वसाहतीमधील एका खाजगी कंपनीत त्याची प्रशिक्षणार्थी म्हणून निवड झाली. तो कालावधी यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर वंदेशची पालघरच्या एका प्रतिथयश टेक्निकल कॉलेजमध्ये लॅब असिस्टंट म्हणून नियुक्ती झाली. या दरम्यान नोकरी करता-करता अन्य अभ्यासक्रमाच्या परीक्षा देण्याचा सल्ला त्याला काही हितचिंतकांनी दिला. त्याला बोर्डी येथील पॉलिटेक्निकल कॉलेजने मदतीचा हात दिल्याने त्याने डिप्लोमा इन कॉम्प्युटर इंजिनिअरींग हा अभ्यासक्र म यशस्वीरित्या पूर्ण केला. परंतु नोकरी करीत असतांना विना परवानगी वंदेशने अन्य कॉलेजमध्ये शिक्षण घेणे आमच्या नियमावलीत बसत नसल्याचे कारण देत त्याला पालघरच्या कॉलेज व्यवस्थापनाने बाहेरचा रस्ता दाखविल्याचे वंदेशने सांगितले. मात्र या धक्क्याने तो डगमगला नाही. त्याच्या प्रयत्नाने तारापूरमधील एका कंपनीत तो रुजूही झाला. आता त्याला इसरोमध्ये काम करण्याची संधी मिळाल्याने तो आनंदित झाला असून एकाच वेळी शासनाची सेवा, देशाची सेवा करण्याची संधी मिळाल्याने तो खूपच आनंदित आहे.
प्रत्येक यशस्वी पुरुषा मागे एक स्त्रीचा हात असल्याचे सांगितले जाते, माझ्यामागे माझ्या आईची अपार मेहनतीचा हात असल्याने मी यशस्वी होऊ शकलो. - वंदेश पाटील, मायखोप.