संजू पवार / विरारवसई तालुक्यात घरफोडी आणि चोऱ्यांचे सत्र सुुरुच असून गेल्या आठ महिन्यात २६७ घरफोड्या आणि ४८६ चोऱ्या सात तालुक्यात झाल्या आहेत. विरार ठाण्याच्या हद्दीत घरफोडी आणि चोरींचे सर्वाधिक गुन्हे घडले आहेत. चार दिवसांपूर्वी रात्री नालासोपारा पूर्वेकडील धणीवबाग येथील जाधव पाडा मधील टेलरिंगचा व्यवसाय करणाऱ्या मेराज अली साबीर अली सलमानी हे घरात नसताना चोरट्यांनी घरातून रोख तीन लाख रुपये चोरून नेले. तर दुसरीकडे कामण चिंचोटी येथील देवदळमध्ये राजीव भजेलू गुप्ता यांच्या मोबाइलच्या दुकानातून एक लाख सत्याऐंशी हजार नऊशे रुपयांचा ऐवज चोरून नेला .वसई तालुक्यात जानेवारी २०१६ ते आॅगस्ट २०१६ या आठ महिन्याच्या कालावधीत २६७ घरफोड्या, चोरीच्या ४८६ घटना घडल्या आहेत. त्यात अनेक घर, सदनिका, बंगलो, वाडी, कारखान्यातून लाखो रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. काही घटनांमध्ये सोन्या चांदीची दुकाने लुटण्यात आली आहेत. यामध्ये चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लुटून नेला आहे. यातील काही गुन्ह्यांची उकलही झालेली आहे. मात्र, अनेक गुन्हे अद्याप उघडकीस आलेले नाहीत. वसई पोलीस ठाण्यात १७, विरारमध्ये ५०, माणिकपूर पोलीस ठाण्यात ४२, नालासोपाऱ्यात ४३, वालीवमध्ये ६१, तुळींजमध्ये ४० आणि अर्नाळा १४ मिळून तालुक्यातील सात पोलीस ठाणंमध्ये गेल्या आठ महिन्यांमध्ये एकूण २६७ घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सर्वाधिक ६१ घरफोडया वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाल्या आहेत. विरार पोलीस ठाणे दुसऱ्या क्रमांकावर असून नालासोपारा, माणिकपूर, तुळींज या पोलीस ठाण्यांमध्येही घरफोडयांची संख्या लक्षणीय आहे.
वसईला चोऱ्या, घरफोडीचे ग्रहण
By admin | Published: October 14, 2016 6:12 AM