- प्रतिक ठाकुर
वसई-विरार मध्ये करोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची वाढ होत चालली आहे. सोमवारी विरारमध्ये करोनाची लक्षणे सापडलेला एक रुग्ण आढळून आला आहे. या वृत्ताला महापौर प्रवीण शेट्टी यांनी दुजोरा दिला आहे. त्यामुळे शहरात करोना बाधितांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
वसईमध्ये आतापर्यत पाच रुग्णांना करोना विषाणूची लागण झाली आहे. त्यात आता विरार पश्चिमेच्या गोकुळ टाऊनशिपमधून आणखीन एक रुग्ण आढळून आल्याचे वृत्त समोर आले आहे. हा रुग्ण ब्राझीलहून परदेशातून आलेल्या शेवटच्या विमानाने भारतात परतला होता. या संदर्भातील माहिती महापालिकेकडे सुद्धा होती. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने या व्यक्तीला १४ दिवसांसाठी घरात विलग (होम क्वारंटाईन) करण्यात आले होते. या क्वारंटाईन दरम्यान त्या व्यक्तीला स्वत: मध्ये कोरोना विषाणूची लक्षणे आढळून येत होती. त्यामुळे त्याने या संदर्भातील माहिती महापालीकेला दिली. त्यानुसार महापालिकेने त्याची तपासणी करून त्याला कस्तुरभा रुग्णालयात पाठवले आहे.
दरम्यान या रुग्णाला करोनाची लागण झाली आहे आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही आहे. या रूग्णा संदर्भात अजून तरी मुंबईच्या कस्तुरभा रूग्णालयातून रिपोर्ट आले नाही आहेत. तसेच रुग्णालयाला ई-मेल केला होता. मात्र रिपोर्ट मिळाले नाही आहेत. त्यामुळे त्याला करोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले नसल्याचे पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी तबस्सुम काझी यांनी सांगितले आहे.
पोलिसांच्या पत्राने खळबळ
अर्नाळा पोलिसांच्या एका पत्राने वसई –विरार मध्ये मोठी खळबळ माजवली आहे. त्यामुळे शहरात अफवांना ही पूर आलाय. या पत्रात विरार पश्चिमेच्या गोकुळ टाऊनशीपमधील एका व्यक्तीला करोना झाला आहे. अशी माहिती पोलिसाना वैद्यकिय अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे. त्यामुळे विरार पश्चिम गोकुळ टाऊनशीप परिसर सील करण्याचे काम अर्नाळा पोलीस करीत आहेत. असे या पत्रात लिहले आहे.
विरार पश्चिमेच्या गोकुळ टाऊनशीपमध्ये करोनाचा रुग्ण आढळला आहे. या रुग्णाने स्वत; हून ही माहिती पालिकेला दिली आहे. त्यानुसार त्याची कस्तुरभा रूग्णालयात तपासणी सुरु आहे.
प्रवीण शेट्टी, महापौर