वसई : संक्रांतीला पतंग उडवतांना पक्षांचं अस्तित्व धोक्यात येतं. त्यामुळे अनेक पक्षांना गंभीर इजा पोचते. मांजात अडकून अनेक कबुतरे दरवर्षी मृत वा गंभीर जखमी होत असतात. यात कबूतरांसोबत चिमण्या, कावळे, घार आदींचा समावेश असतो. संक्र ांती सणाच्या कालावधीत विरार येथे दरवर्षी करूणा ट्रस्टमार्फत पक्षी उपचार शिबीर घेतले जाते. यावर्षी तीन दिवसात माजांत अडकल्याने अथवा त्याच्या संपर्कात आल्याने ४ कबुतरे ठार झालीत. १७ कबूतरे जखमी झालीत. त्यांच्यावर ट्रस्ट मार्फत उपचार करण्यात आले आहेत.
संक्रातनिमित्त मोठ्या प्रमाणात पतंग उडवण्यात येत असतात. मात्र या पतंगांच्या मांज्यात अडकून अनेक पक्षांचा नाहक जीव जातो. तर काही जखमी होतात. प्राणीमित्रांकडून याबाबत दरवर्षी जनजागृती केली जात असते. करूणा ट्रस्टच्या मार्फत विरार येथे तीन दिवस पक्षी चिकित्सा शिबीर घेतले जात असते. यावर्षी या शिबिरात पतंगाच्या मांज्यात अडकून जखमी झालेल्या सतरा कबूतरांवर उपचार करण्यात आले. यापैकी दोन कबूतरांना उपचारानंतर सोडून देण्यात आले. तर चार कबूतरांचा दुदैवी मृत्यू झाल्याची माहिती अॅनिमल वेल्फेअर बोर्ड आॅफ इंडियाचे सदस्य मतिेश राठोड यांनी दिली.
वसई विरार अग्नीशमन दलाच्या केंद्रात गेल्या तीन दिवसात सहा ठिकाणी पतंगाच्या मांज्यात कबूतर अडकल्याचे कॉल आले होते. अग्नीशमन जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन मांज्यात अडकलेल्या कबूतरांची सुटका केली. यात तुळींज येथून चार, विरार येथून एक व वसई येथून एका कबूतराचा समावेश होता, अशी माहिती दिलीप पालव यांनी दिली.