नालासोपारा : वसई रोड स्थानकावरून सकाळी ९ वाजून ५६ मिनिटांनी सुटणारी महिला विशेष लोकल (लेडीज स्पेशल) आता विरारहून सुटणार आहे. यामुळे या ट्रेनने रोजचा प्रवास करणा-या महिला प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ही लोकल विरारहून सोडली तर वसई, नायगांव आणि भार्इंदरच्या महिला प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. ही लोकल पूर्ववत सुरू करण्यासाठी महिलांनी पश्चिम रेल्वेकडे निवेदने पाठविण्यास सुरवात केली आहे.
विरार-नालासोपारा-वसई मधून दररोज लाखो प्रवासी मुंबईला प्रवास करत असतात. वसईहून सकाळच्या वेळी एकूण चार लोकल सुटतात. तर एक महिलांसाठी विशेष लोकल असते. ती सकाळी ९ वाजून ५६ मिनिटांनी सुटते. त्या लोकलचा वसई आणि नायगाव मधील महिला प्रवाशांना मोठा फायदा होतो. वसईहून ही महिला विशेष ट्रेन सुटत असल्याने वसई नायगाव पासून मीरारोड आणि भार्इंदरच्या महिला प्रवाशांना बसायला जागा मिळते. विरारहून लोकल ट्रेन आली तर त्यात शिरायलाही जागा नसते. वसई वरून सुटणारी महिला स्पेशल महिलांना मुंबईला जाण्यासाठी सोयीची होती पण ती आता रद्द करून विरार वरून सुरु करण्यात येणार असल्याने वसई, नायगाव मीरा भार्इंदर येथील महिलाप्रवाशांना त्रास सोसावा लागेल.