वसई : वसई-विरार शहरातील नागरिकांचे आरोग्य निरोगी व उत्तम राहावे, यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागांतर्गत नियुक्त केलेल्या ठेका पद्धतीवरील सात आरोग्य निरीक्षकांना वारंवार सूचना तसेच मुदतवाढ देऊनही त्यांनी शहर स्वच्छतेच्या कामात ढिसाळपणा सुरूच ठेवल्याने या सर्वांवर नवनियुक्त पालिका आयुक्तांनी निलंबनाची कारवाई केली आहे.वसई-विरार शहरातील ई प्रभागात शहर स्वच्छता कामासाठी मे. वसुंधरा अर्थ मूव्हर्स कंपनीला सात आरोग्य निरीक्षक पुरवण्याचा ठेका २०१८ मध्ये देण्यात आला आहे. या ठेक्यामध्ये रस्ते, चौक, फुटपाथ, मुख्य रस्ता, दुभाजक आदींची दैनंदिन स्वच्छता करणे, रस्त्याच्या कडेचे मातीचे ढीग हटविणे, गटारातील गाळ काढणे, तसेच कचऱ्याचे वर्गीकरण करून ते पालिकेच्या डम्पिंग ग्राऊंडमध्ये टाकणे, दररोज शहरात औषध फवारणी करणे, आदी कामांचा समावेश आहे. एकूणच पावसाळापूर्व कामे पार पाडण्यासाठी नालासोपारा पश्चिमेस ठेका पद्धतीवर सात आरोग्य निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली होती.दरम्यान, या ठेका पद्धतीवरील सातही आरोग्य निरीक्षकांचे शहर स्वच्छतेचे काम पूर्णत: असमाधनकारक असल्याचा ठपका ठेवत अखेर आयुक्त गंगाधरन डी. यांनी या सर्वांना तात्काळ कामावरून कमी करण्याचे आदेश काढले. तसेच हे काम पूर्ण करण्यासाठी या सातही जणांना आठ दिवसांची मुदतही दिली होती. तर त्या मुदतीतही काम असमाधानकारक वाटल्याने दुसऱ्यांदा वाढ देण्यात आली. तरीही शहर स्वछतेच्या कामात सुधारणा न झाल्याने अखेर पालिकेने ठेकेदाराला याबाबत कळविले.>निलंबित केलेल्यांची नावेमोहिनी पवार, संदेश जाधव, हेमंत जाधव, निखिल गमरे, आशीष पष्टे, सना खलील शेख आणि नितीन म्हात्रे.
वसई महापालिकेच्या आयुक्तांचा सात आरोग्य निरीक्षकांना दणका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2020 1:45 AM