वसई : वसई-विरार शहर महापालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ महासभेविनाच आणि निरोपाशिवायच शुक्रवारी संपुष्टात आला. यामुळे सर्व नगरसेवक आणि खासकरून सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, आयुक्त गंगाथरन हेच प्रशासकाच्या भूमिकेत असल्याने आता सत्ताधाऱ्यांचीच डोकेदुखी वाढणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
शनिवार, दि. २७ जूनला चौथा शनिवार आल्याने सार्वजनिक सुट्टी होती. त्यात कोरोनामुळे गर्दी व निरोप समारंभ केला गेला नाही. यामुळे येथील सर्व नगरसेवकांचा कार्यकाळ दोन दिवस आधीच म्हणजेच २६ जून रोजीच संपला असून दि. २८ जून रोजी पालिकेचा कार्यकाळ संपत आहे. यामिमित्ताने महापौर, उपमहापौर, विरोधी पक्षनेते, तसेच नगरसेवकांना निरोपाची भाषणे करता आली नाहीत. तसेच यानिमित्ताने नवीन आयुक्तांच्या कामकाजावर ताशेरेही मारता आले नाहीत. पालिकेच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले आहे.
वसई-विरार महापालिकेच्या नगरसेवकांचा कार्यकाळ दि. २८ जूनला रविवारी संपत आहे. दि. १६ मार्चला अर्थसंकल्पीय सभा झाल्यानंतर कोरोना संक्रमणाच्या भीतीमुळे केंद्र आणि राज्य सरकारने टाळेबंदी जाहीर केल्यामुळे महापालिकेची एकही सभा झाली नाही. त्यातच पालिकेमध्ये नव्याने आलेले आयुक्त गंगाथरन डी. यांनी प्रत्यक्षात कारभार हाती घेतल्यानंतर लोकप्रतिनिधींना न विचारता निर्णय घेण्यास सुरुवात केल्याने हा सत्ताधारी बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का होता. त्यातच शहरात कोरोनाने घातलेल्या थैमानाला आवर घालण्यास प्रशासन सपशेल अपयशी ठरत असल्याच्या पार्श्वभूमीवर महासभा घ्यावी, यासाठी महापौर प्रवीण शेट्टी यांनी आयुक्तांना पत्रे, निवेदने देऊनही आयुक्तांनी त्यावर निर्णय न घेतल्याने अखेर २६ जून रोजीच नगरसेवकांचा कार्यकाळ महासभेविनाच संपुष्टात आला आहे.बविआला फटका : विरोधक खूशरविवार, दि. २८ जूननंतर वसई-विरार महानगरपालिकेवर आयुक्तगंगाथरन डी. यांचीच प्रशासक म्हणून राज्य शासनाने नेमणूक केलेली आहे. महापालिकेच्या इतिहासात निवडणुकीपूर्वीचा काळ सत्ताधाºयांशिवाय प्रशासकाच्या हातात राहणार असल्याने त्याचा सर्वाधिक फटका सत्ताधारी बहुजन विकास आघाडीला बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे वसई-विरारमधील विरोधी पक्षांमध्ये मात्र आनंद व्यक्त होत आहे.