आशिष राणे वसई : 29 गावांचा समावेश महापालिकेतच राहणार की त्या वगळलेल्या 29 गावांची स्वतंत्र नगरपंचायत निर्माण होणार याबाबतीत 11 जून 2021 रोजी मुंबईउच्च न्यायालयात मागील दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सदरच्या याचिकेवर निर्णय येणार होता. मात्र शुक्रवारी ही सुनावणी झालीच नसल्याची माहिती गाव बचाव आंदोलनचे मिलिंद खानोलकर यांनी लोकमतला दिली.या गावांच्या अंतिम सुनावणीच्या बाबतीत बोलताना कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईउच्च न्यायालयातील कामकाज केवळ ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. तर आता दि 15 जून नंतर पुन्हा एकदा उच्च न्यायालयास विनंती करून या 29 गावांच्या सुनावणी बाबतीत पुन्हा तारीख घेतली जाईल, असे मिलिंद खानोलकर यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.दरम्यान, मागील 10 वर्षांपासून वसई विरार महापालिकेतून 29 गावे वगळण्याचे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. किंबहुना दोन महिन्यांपूर्वी दि 9 एप्रिल 2021 रोजी मुंबई उच्च न्यायालयात अंतिम निर्णय टप्प्यावर असताना सुनावणी संपन्न झाली. मात्र सरकारी पक्षाचे ज्येष्ठ वकील तांत्रिक कारणांमुळे गैरहजर राहिल्याने तो निर्णय झाला नाही.याउलट त्यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला 29 गावे वगळण्याच्या संदर्भातील सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलून राज्य सरकार सोबत सल्लामसलत करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांचा अवधी दिला होता आणि तोच अवधी शुक्रवार दि 11 जून रोजी संपुष्टात येऊन मुंबई उच्च न्यायालयात शुक्रवार दि.11 जून 2021 रोजी 29 गावा संदर्भात अंतिम निर्णय येण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र शुक्रवारी गावं वगळण्याच्या याचिकेबाबत काहीही निर्णय आला नाही. त्यासाठी आता पुन्हा काही दिवसांची वाट पाहावी लागणार आहे.
वसई :२९ गावांचा न्यायनिवाडा नाहीच; अंतिम सुनावणीसाठी पुन्हा वाट पाहावी लागणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 8:36 PM
गेल्या अनेक वर्षांपासून निर्णय प्रलंबित. शुक्रवारीही सुनावणी न झाल्याची माहिती.
ठळक मुद्देगेल्या अनेक वर्षांपासून निर्णय प्रलंबित. शुक्रवारीही सुनावणी न झाल्याची माहिती.