वसई : वसई पंचायत समितीमध्ये अधिकारी व पदाधिकारी यांच्यात सुरू असलेले शीतयुद्ध अद्याप थांबायचे नाव घेत नाही. उपसभापतींनी तत्कालीन तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कामकाजासंदर्भात गटविकास अधिकाऱ्यांकडे माहिती मागविली आहे. ही माहिती मिळत नसल्याचा आरोप पंचायत समितीच्या उपसभापतींनी केला आहे.वसई पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या लेखी पत्रात उपसभापती जयप्रकाश ठाकूर यांनी एकूण ६ बाबींचा उल्लेख केला आहे. त्यामध्ये वैद्यकीय विभागाकडे कोणत्या योजनेअंतर्गत किती निधी आला व त्याचा विनियोग कसा झाला, अशा कर्मचाऱ्यांची भरती कशी झाली व त्यासाठी निकष काय लावले, वर्मा लॅबकडून करण्यात आलेल्या साहित्य खरेदीची माहिती, आरोग्य परिचारिका यांच्या बदल्यासंदर्भात कोणते निकष लावण्यात आले तसेच परिचारिकांची सेवाज्येष्ठता हेतुपुरस्सर लपवून ठेवण्यात आली का? तालुकाअंतर्गत बदली समुपदेशन याबद्दलची माहिती तसेच संपूर्ण चित्रण व सध्या तालुक्यामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून कोणाकडे कार्यभार आहे, इ. माहिती देण्यात यावी, असे नमूद केले आहे. हे पत्र देऊन १५ दिवसांचा कालावधी उलटून गेला परंतु अद्याप गटविकास अधिकाऱ्यांनी याबाबतची कोणतीही माहिती उपलब्ध केलेली नाही. या पत्राच्या प्रती उपसभापतींनी वसईचे आ. हितेंद्र ठाकूर व पालघर जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिंदे यांना पाठविल्या आहेत.दोन दिवसांपूर्वी वसईचे गटशिक्षण अधिकारी कोण? असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर आता आरोग्य विभागाचा सावळा गोंधळ कारभार उघड झाला आहे. खुद्द उपसभापतींनाच पंचायत समितीच्या कारभाराची माहिती मिळू शकत नाही, यावरून प्रशासन व पदाधिकारी यांच्यामध्ये दरी निर्माण झाली आहे, हे स्पष्ट होत आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास पं.स.चा संपूर्ण कारभार विस्कळीत होऊ शकतो.
वसई पंचायत समितीला घरचा आहेर
By admin | Published: July 16, 2015 11:47 PM