विरार : राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला होता. मात्र, वसई - विरार शहरात प्लास्टिक बंदीचा फज्जा उडाला असून मार्केटमध्ये याचा सर्रास वापर होताना दिसतो आहे. दरम्यान, पालिका ८० टक्के प्लास्टिक बंदीचा दावा करत असली तरी, हा दावा शहरात फोल ठरताना दिसतो आहे. त्यामुळे महापालिकेने पुन्हा एकदा कारवाई सुरू करण्याची मागणी होत आहे.
राज्यात २३ जून २०१८ पासून प्लास्टिकबंदी लागू करण्यात आली. त्यांनतर वसई - विरार महापालिकेने प्लास्टिकचा वापर थांबवण्यासाठी दुकानदार, भाजीवाले, हॉटेल मालक, किरकोळ विक्र ेते, मच्छी-मटण विक्रेते यांच्याकडे पत्रकांचे वाटप केले होते. तसेच पथनाट्यांच्या माध्यमातून प्लास्टिकबंदीचा नाराही दिला होता. शहरातील प्लास्टिकच्या अनेक कंपन्यांना सील ठोकून मोठा साठा जप्त करण्यात आला होता. या कारवाईमुळे भाजीवाले, विक्रेते, फेरीवाल्यांमध्ये भीती निर्माण झाल्याने त्यांनी देखील प्लास्टिकचा वापर टाळला होता.
प्लास्टिकबंदीच्या आदेशानंतर वर्षभर चाललेल्या या कारवाईमुळे शहर प्लास्टिकमुक्त झाले होते. मात्र, त्यांनतर पालिकेची कारवाई नरमल्याने पुन्हा प्लास्टिक वापरात आल्याचे शहरातील भाजीवाले, विक्रेते, फेरीवाल्याच्या गाड्यांवरून दिसते आहे. त्यामुळे वसई-विरारमधील संतोष भुवन, बिलालपाडा, नायगाव, पापडी भागातील विक्रेते, भाजीवाले, हॉटेलवाले उघडपणे प्लास्टिक पिशव्यांमध्ये वस्तू देताना दिसत आहेत. राज्यात जरी प्लास्टिकबंदी असली, तरी वसई- विरार महापालिकेमध्ये मात्र ती कागदोपत्रीच असल्याचे दिसत आहे.