वसई : वसईतील पोलीसांना पोलीस निरीक्षकामुळेच धोका निर्माण झाल्यामुळे त्याला पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार आनंद ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.वसईतील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी खाजगी सर्व्हेअर काळे अँड असोसिएटस यांनी एका बड्या इसमाच्या बंगल्यासाठी रस्ता मिळावा, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अखत्यारीतील वसई पोलीस लाईनच्या नावे असलेल्या जागेच्या बोगस सातबाऱ्यात दाखवून व सरकारी नकाशात फेरबदल करून बनावट आणि खोटे दस्तऐवज तयार केले आहेत. त्यामुळे संबंधीतांवर फौजदारी दखलपात्र गुन्हा दाखल दाखल करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वसई पोलीस लाइनमध्ये राहणाऱ्या सर्व महिलांनी मुख्यमंत्र्यांकडे एका अर्जाद्वारे केली होती.त्यात पोलीस शिपाई शशिकांत कांबळे यांच्या पत्नीचाही समावेश होता. त्यामुळे कांबळे यांच्याबद्दलचा राग मनात धरुन वसई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांनी शशिकांत कांबळे यांच्या विरोधात बदनामी सुरु केली आहे. पोलीस लाईनमध्ये अतिक्रमण करण्यात आल्याची तक्रार महिलांनी केली असताना ही तक्रार पोलीस शिपाई कांबळे यांनी केल्याचे संपतराव पाटील यांनी भासवले. जमिल शेख यांना पाठवलेल्या नोटीसीत पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांनी थेट शशिकांत कांबळे यांनी तक्रार केल्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे. सर्वे क्र.९ ब, १ हेक्टर ८४ गुंठे या सरकारी जागेत जमील अहमद शेख यांनी अतिक्रमण करून बंगला उभारला आहे.आणि या बंगल्यात जाण्यासाठी पोलीस लाइनची जागा हडप करून त्यावर रस्ता उभारण्यात आला आहे. अशी तक्रार शशिकांत कांबळे यांनी केल्याचे संपतराव पाटील यांनी जमील शेख यांना लेखी कळवून चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले. विशेष म्हणजे पाटील यांनी शेख यांना दोन वेळा चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावूनही शेख पोलीस ठाण्यात फिरकलेसुद्धा नाहीत. त्यांच्यावर कारवाई करण्याचे सोडून पाटील यांनी तक्रारदार पोलीस आणि त्यांच्या कुुटुंंबियांची नावे उघड करून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक शशिकांत कांबळे यांनी पोलीस निरीक्षक पाटील यांनी नोटीसीत आपल्या नावाचा उल्लेख करून याप्रकरणात आपल्याला नाहक गुंतवल्याची तक्रार वरिष्ठांकडे केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. शेख यांच्यावर कारवाई करण्याऐवजी कांबळे यांच्याबाबत शेख यांच्या मनात अढी निर्माण होईल, या हेतूनेच पोलीस निरीक्षक पाटील यांनी नोटीस बजावल्याचा आरोप आमदार ठाकूर यांनी केला आहे. (वार्ताहर)
वसईतील पोलीसाला वर्दीतील निरीक्षकापासूनच धोका ?
By admin | Published: October 14, 2016 6:04 AM