वसई : वसई-विरार महापौर मॅरेथॉन स्पर्धा रविवार, दि. ८ डिसेंबर रोजी होणार आहे. या मॅरेथॉन स्पर्धेत १८ हजाराहून अधिक स्पर्धक सहभागी होणार असून महापालिकेतर्फे सर्व तयारी पूर्ण झाली आहे. तसेच मॅरेथॉन स्पर्धेनिमित्त रविवारी वाहतूक मार्गातही बदल केला गेला आहे.
वसई-विरार महापालिका व इंडियाबुल्स होम लोन यांच्या वतीने नवव्या महापौर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे १८ हजाराहून अधिक धावपटंूचा सहभाग असलेल्या या स्पर्धेप्रसंगी ‘गेस्ट आॅफ आॅनर’ म्हणून आशियाई मॅरेथॉन चॅम्पियन टी. गोपी उपस्थित राहणार आहे.
दरम्यान, मॅरेथॉनसाठी महापालिकेने तयारी पूर्ण केली आहे. मॅरेथॉन मार्गात ज्या ठिकाणी खड्डे आहेत, त्या ठिकाणी डांबरीकरण करून पांढºया रंगाचे पट्टे, योग्य दिशा माहिती पडावी यासाठी झाडांना रंग, दिशादर्शक फलक, संरक्षण जाळ्या आणि ज्या मार्गावर स्पर्धक धावणार आहेत, त्या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
अशी असेल स्पर्धा
पूर्ण मॅरेथॉनला न्यू विवा कॉलेज, विरार पश्चिम येथून सकाळी ६ वाजता सुरुवात होणार आहे. या गटात राहुल पाल, मोहित राठोड, ब्रह्मप्रकाश, सुखदेव सिंग, पंकज धाका, रंजित मलिक, धर्मेंदर या उत्कृष्ट धावपटूंचा सहभाग असणार आहे. पुरुषांची अर्धमॅरेथॉन वसई पश्चिम येथून सकाळी ६.३० वाजता सुरू होईल.
यामध्ये शंकर मान थापा, दुर्गा बहादूर, अंकित मलिक, अनिश थापा, एल. रंजन सिंग हे चमक दाखवण्यास सज्ज आहेत. महिला अर्ध मॅरेथॉनमध्ये आरती पाटील, स्वाती गढवे, अर्पिता सैनी आणि गार्गी शर्मा यांच्यात चुरस आहे. तसेच ११ कि.मी. रनला न्यू विवा कॉलेज येथून सकाळी ६.१० सुरुवात होईल. तर ५ कि.मी. टाईम रन सकाळी ७.२५ वाजता न्यू विवा कॉलेज येथून सुरू होईल. सर्व ज्युनिअर गटातील स्पर्धा तसेच सिनीयर सिटीझन रन व धमाल धाव न्यू विवा कॉलेज येथून सुरू होतील.
वाहतूक मार्ग बंद
मॅरेथॉन असलेल्या मार्गावर सकाळी ६ ते दुपारी १ या वेळेत वाहतुकीसाठी बंदी घालण्यात आली आहे. तिरुपतीनगर, जकातनाका, बोळींज नाका, पाटील आळी, उमराळे चर्च, चक्रेश्वर तलाव, हेगडेवार चौक, समेळपाडा, नालासोपारा रेल्वे उड्डाणपूल, आचोळे रोड, सोळंकी मेडिकल, वसंत नगरी, वसई स्थानक मार्ग, वसई रेल्वे उड्डाणपूल, डॉ. आंबेडकर चौक, माणिकपूर नाका, बाभोळा नाका, पापडी नाका, तामतलाव नाका, चिमाजी आप्पा मैदान, वसई गाव बस डेपो, पारनाका, रमेदी क्रॉस, तरखड, देवतलाव, बंगली नाका या भागात वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे.