- मंगेश कराळे
नालासोपारा - विजेचा झटक्याने बाह्यस्रौत शिकाऊ महावितरण कर्मचाऱ्याचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री वसईत घडली आहे. अभिजीत सूर्यकांत लकेश्री (२२) असे या घटनेत मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव असून तो वसईच्या उमेळमान येथील जरीमरी अपार्टमेंटमध्ये राहत होता.
वसईच्या सातिवली येथे सोमवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास परिसरातील विजपुरवठा खंडीत झाला होता. अभिजीतला विजेच्या खांबावर वीज दुरुस्तीचे काम करण्यासाठी त्याच्या वरिष्ठांनी सांगितले होते. यावेळी त्याला विजेच्या खांबावर जोरदार विजेचा झटका बसल्यांनतर तो खाली कोसळला. त्यानंतर त्याला त्वरित तुळींज विजयनगर येथील पालिकेच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. मंगळवारी वालीव पोलीस ठाण्यात महावितरण कंपनीत त्याच्यासोबत काम करणारे त्याचे काका शंकर लकेश्री यांनी दिलेल्या तक्रारीवरून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
शंकर लकेश्री यांनी या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. अभिजित हा गेल्या एक वर्षापासून महावितरण कंपनीत बाह्यस्त्रोत्र कर्मचारी म्हणून काम करत होता. दहा दिवसांपूर्वीच तो सातीवलीच्या महावितरणच्या शाखेत रुजू झाला होता. त्याच्या पश्चात आई, वडील व भाऊ असा परिवार असून त्याच्या मृतदेहावर रायगड जिल्ह्यातील माणगाव, गोरेगाव येथे बुधवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. महावितरण कंपनीत बाह्यस्तोत्र कर्मचाऱ्यांना अनुभव गाठीशी नसतांना रात्री बेरात्री वीस पुरवठा खंडित झाल्यानंतर विज दुरुस्तीच्या कामासाठी पाठवल्यामुळे असे अपघात घडत असल्याचा आरोप काही कर्मचाऱ्यांनी केला आहे.