शशी करपे ।वसई : किमान वेतनासह इतर मागण्यांसाठी काम बंद आंदोलन केल्यानंतरही ठेकेदार आणि प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करून वसई परिवहनमधील श्रमजीवी कामगार संघटनेने सोमवारपासून बेमुदत काम बंद सुुरु केले आहे. किमान २० हजार रुपये वेतन दिल्याशिवाय आता माघार नाही असा पवित्रा संघटनेने घेतला आहे. तर ठेकेदाराने आपण राज्य सरकारच्या धोरणानुसारच वेतन देत असून संघटनेच्या मागण्यांबाबत महापौर आणि आयुक्तांनी निर्णय घ्यावा असे सांगून संघटनेच्या मागण्या जवळपास फेटाळून लावल्या आहेत.वसई विरार महापालिकेची परिवहन सेवा भागिरथी ट्रन्स प्रा. लिमिटेड या ठेकेदारामार्फत चालवली जाते. सध्या १७० बसेस रस्त्यावर धावत असून ठेका पद्धतीवर ४३३ कामगार कार्यरत आहेत. गेल्या सहा महिन्यापासून किमान वेतनासाठी श्रमजीवी कामगार संघटना ठेकेदार आणि प्रशासनाशी भांडत आहे. पण, राज्य सरकारच्या धोरणानुसार कामगारांना वेतन दिले जाते असा दावा करून ठेकेदाराने संघटनेची मागणी दुर्लक्षित केली आहे. त्यामुळे श्रमजीवी कामगार संघटनेने सोमवारी दिवसभर काम बंद आंदोलन पुकारले होते. पण, दिवसभरात प्रशासन अथवा ठेकेदाराने संपर्क न साधल्याने सोमवारी संध्याकाळी बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.सोमवारी पहाटेपासून परिवहनच्या बस बंद असल्याने प्रवासी आणि विद्यार्थ्यांचे हाल सुरु झाले आहेत. वसई तालुक्यात सध्या फक्त २१ रुटवर एसटीची बस सेवा सुरु आहे. उर्वरित सर्व रुटवर परिवहनच्या बसेस धावतात. ठाणे, मुलुंड या परिसरातही परिवहनच्या बसेस धावतात.संपामुळे या मार्गावरील सर्व बसेस बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांचे सकाळपासूनच हाल सुरु झाले आहेत. त्याचा फायदा रिक्शाचालक उठवू लागले असून प्रवाशांची अडवणूक करून आर्थिक लुटमार सुरु झाल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून केल्या जात आहेत.सफाई कामगारांना १५ हजार रुपये वेतन मिळते. तर परिवहन सेवेतील कुशल कामगारांना किमान २० हजार रुपये वेतन मिळालेच पाहिजे यासाठी आता आम्ही आग्रही आहोत. मागण्यांसाठी एक दिवसाचे काम बंद आंदोलन केले असताना ठेकेदाराने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. हा प्रश्न ठेकदाराने सोडवला पाहिजे. आम्ही महापौर आणि आयुक्तांशी चर्चा करणार नाही. तीन वर्षात ४०० गाड्या आणण्याचे बंधन असताना पाच वर्षात फक्त १७० बसेस आहेत. त्यातील ४० बसेस महापालिकेच्या मालकीच्या आहेत. लाखो रुपये किंमतीच्या बसेस चालवून फायदा कमावणारा ठेकेदार एका बसचे वर्षाला फक्त एक हजार रुपये भाडे देऊन लुटमार करीत आहे. अनेक बसेस खटारा आणि कालबाहय आहेत. अशा स्थितीत जीव धोक्यात घालून बसेस चालविणाºया चालक, वाहक व कामगारांना विम्याचे संरक्षण नाही. म्हणूनच सर्व मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आता माघार नाही. प्रशासनाच्या आडमुठेपणामुळे बेमुदत बंदचा निर्णय घ्यावा लागत आहे. -वसई परिवहन श्रमजीवी कामगार संघटनाकामगारांना देत असलेले वेतन योग्य असल्याचे राज्य सरकारच्या नगरविकास खात्याने म्हटलेले आहे. सध्या प्रत्येक कामगारांना सर्व भत्ते मिळून किमान १५ हजार रुपये वेतन दिले जाते. परिवहन सेवा तोट्यात असूनही कामगारांना सर्व सुविधा दिल्या जातात. कामगार आणि प्रवाशांचा फायदा होईल अशाच पद्धतीने सर्व गाडीचा विमा काढला जातो. कामगार सध्या अवास्तव मागण्या करीत असून यासंंबंधी महापौर आणि आयुक्त निर्णय घेतील.- मनोहर सकपाळ,ठेकेदार, परिवहन सेवा
वसई परिवहनचे कामगार बेमुदत संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 3:04 AM