वसई : हायवेवरून नालासोपारा येथे निघालेली वसई विरार परिवहनची बस इंधन संपल्याने रस्त्यातच बंद पडली. सर्व्हिस टेम्पोने इंधन आणून भरल्यानंतर ती मार्गस्थ झाली. परंतु प्रवाशांची मात्र गैरसोय झाली. निरनिराळ्या घटनांमुळे वादग्रस्त ठरलेली वसई-विरार महापालिकेची परिवहनसेवा आता रामभरोसे चालल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे नवनवीन सेवा आणि बसेस देण्याचा पालिकेचा दावा फोल ठरल्याची चर्चा आहे. सेवा सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारी असल्याचे सांगून वसई तालुक्यासह थेट ठाण्यापर्यंत वाढवण्यात आली. एस.टी. पेक्षा कमी भाडे आणि गाड्यांच्या जास्त फेऱ्या असल्यामुळे अल्पावधीतच हजारो प्रवासी या सेवेकडे आकर्षीत झाले. मात्र, नंतर ही सेवा वादग्रस्तही ठरू लागली आहे.या गाड्यांची नियमीतपणे तपासणी केली जात नाही. इंधनाचीही तपासणी न करता त्या बंद पडेपर्यंत चालवण्यात येत असल्याचे तुळींज येथे उघडकीस आले आहे. हायवेवरून नालासोपाराकडे जाणारी एम.एच.४८ के-२१० ही बस काल दुपारी नालासोपारा टाकी रोडजवळ बंद पडली. त्यामुळे सर्व प्रवाशांना चालतच स्टेशनकडे जावे लागले. ही गाडी इंधन संपल्यामुळे बंद पडल्याचे कळल्यावर परिवहन सेवेच्या सर्व्हिस टेम्पोने या बसला डिझेलचा पुरवठा केला. हे दृश्य पाहणाऱ्या पादचाऱ्यांनी परिवहन सेवेची खिल्ली उडवली. तसेच अशा रामभरोसे बसमधून प्रवास करून वेळ फुकट घालायचा का असा सवाल करून याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आयुक्तांकडे करण्यात येणार आहे. आता आयुक्त व प्रशासन संबंधितांवर काय कारवाई करतात याकडे प्रवासी व शहरवासियांचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)
वसई परिवहन राम भरोसे
By admin | Published: August 10, 2016 2:15 AM