नालासोपारा : वसई विरार महानगरपालिकेच्या हद्दीमधील धोकादायक व अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न पावसाळ्यापूर्वी ऐरणीवर आला आहे. मनपाने ५८७ धोकादायक इमारतींना नोटिसा धाडल्या असून १९८ इमारतींना अतिधोकादायक म्हणून घोषित केले आहे. नोटीस धाडलेल्या इमारतींना दुरुस्ती किंवा इमारतीखाली करण्याच्या सूचना दिल्या आहेत पण मनपाकडे अद्यापपर्यंत एकही ट्रान्झिट कॅम्प (संक्रमण शिबिर) नाही. धोकादायक इमारतींना नोटिसा पाठवून मनपाने आपला पल्ला झाडला आहे. पावसाळ्यात एखादी अप्रिय घटना घडून काही जीवितहानी झाली तर आम्ही नोटीस पाठवली होती असे सांगण्यास मनपा व अधिकारी मागे राहणार नाहीत एवढे मात्र खरे!पावसाळ्यापूर्वी महापालिका शहरातील धोकादायक इमारतींची पाहणी करून त्याचा अहवाल दरवर्षी तयार करते. त्यानुसार धोकादायक इमारतींची तीन वर्गात वर्गवारी केली जाते. ज्या अतिधोकादायक इमारती असतात त्यांना तत्काळ खाली करायचे असते. पालिकेकडे संक्रमण शिबिर नसल्याने अद्याप एकाही अतिधोकादायक इमारतींच्या रहिवाशांना बाहेर काढून त्यांचे इतर ठिकाणी पुनर्वसन करण्यात आलेले नाही. या वर्षी पालिकेने ५८७ धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे. त्यापैकी १९८ अतिधोकादायक इमारती, सी वन मध्ये ८१ इमारती, सी टू मध्ये १९७ इमारती तर सी थ्री मध्ये १११ इमारती अशी यादी मनपाने तीन गटात केली आहे. परंतु अद्यापही १९८ अतिधोकादायक इमारतींमध्ये रहिवासी रहात आहेत. पावसाळ्यात या धोकादायक इमारती केव्हाही कोसळू शकतात. यामुळे वसई विरार मनपाने वेळीच खबरदारी घेणे गरजेचे आहे.>नालासोपाऱ्याात असंख्य धोकादायक इमारतीनालासोपारा पूर्वेकडील विभागात मोठ्या प्रमाणात धोकादायक इमारती आहेत. वसई विरार मनपाने या इमारतीकडे लक्ष देवून कारवाई केली पाहिजे, अशी जनतेची मागणी आहे. नालासोपारामध्ये धोकादायक इमारतींचा काही भाग कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. पण नालासोपारा मनपा विभाग दरवर्षी पावसाळ्याआधी धोकादायक इमारतीना नोटीस देतो पण कारवाई मात्र शून्य असते. पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे, पण कारवाई केली नसल्याने या इमारतीत राहणारे रहिवासी आपला जीव मुठीत घेवून राहतात.नालासोपारामधील टाकी रोड, ओस्तवाल नगरी, विजय नगर, साईनाथ नगर, आत्मवल्लभ सोसायटी, कपोल नगर, संखेश्वर नगर, आचोले रोड या विभागात मोठ्या प्रमाणात धोकादायक इमारती आहेत. या इमारतीवर कारवाई झाली नाही तर मोठी घटना पावसाळ्यात होऊन मोठी जीवितहानी घडू शकते.>धोकादायक इमारतींना वेळोवेळी नोटिसा पाठवत असतो. या इमारतीमधील रहिवाशांनी त्यानुसार इमारतीची डागडुजी, मजबुतीकरण करून घ्यायचे असते. इमारत अतिधोकादायक असेल तर रहिवाशांनी ती स्वत:हून खाली करायची असते मनपाच्या नोटीसांकडे या इमारतीत राहणारे लोक काणाडोळा करतात. - रमेश मनाळे,(अतिरिक्त आयुक्त, वसई-विरार शहर महानगरपालिका)
वसई-विरारला ५८७ इमारती धोकादायक, नोटिसा जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 12:55 AM