नालासोपारा : वसई-विरार महानगरपालिकेने शनिवारपासून कोरोनाची लस देण्यास सुरुवात केली असून पहिल्याच दिवशी ६३ जणांना लसीकरण करण्यात आले. पहिल्याच दिवशी आरोग्य विभागातील कर्मचारी, पोलिसांना ही लस देण्यात आली आहे. महानगरपालिकेने दिवसाला एक हजार जणांना कोरोनाची लस देण्याचे ध्येय आखले आहे.
आता फक्त सरकारी कर्मचाऱ्यांना ही लस देणार असल्याचे मनपा अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. महानगरपालिकेतर्फे १० ठिकाणी ही लस देण्यासाठी टीम सज्ज करण्यात आली आहे. ज्यांना लस घ्यावयाची आहे, त्यांची मनपाने केलेल्या ॲपवर नोंद केल्यावर त्याची संपूर्ण माहिती गोळा करत त्याची नोंदणी पूर्ण झाल्यावरच त्यांना लस देणार असल्याचे मनपाचे जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले. शनिवारी पहिल्याच दिवशी ६३ जणांना कोरोनाची लस दिल्याचेही सांगितले. आरोग्य विभागाच्या सुनीता मोहोड यांना पहिली लस देण्यात आली.