- मंगेश कराळे नालासोपारा - वसई विरारमध्ये रस्त्यांवरील जीवघेणा खड्डयांमूळे सामान्य नागरिक त्रस्त आहेत. खड्डयांसाठी राजकीय पक्षांनी विरोध केल्यानंतरही प्रशासन खड्डे बुजवत नाही. नायगावच्या जूचंद्र नाका येथे खड्डयांसाठी मंगळवारी सकाळी रिक्षा चालक मालक संघटनेने रास्ता रोको आंदोलन केले. जवळपास सहा तास वाहतूक ठप्प होती. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. लोक कामासाठी आठ-आठ किलोमीटर चालत कामावर गेले. मनपा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
नायगावचे रस्ते दरवर्षी पावसात पूर्णपणे तुटतात. कारण प्रत्येक वेळी कंत्राटदारांकडून निकृष्ट दर्जाचे रस्ते बनवले जातात. पहिल्याच पावसात रस्ते खचून खराब होतात. नायगावच्या रस्त्यांवर अगणित खड्डे पडल्याने नागरिकांना चालणे कठीण झाले आहे. खड्डयांमूळे दररोज अपघात होत आहेत. नायगाव स्टेशन ते मुंबई अहमदाबाद महामार्ग पर्यंतचा संपूर्ण रस्ता खड्डयात गेला आहे. खड्यांमूळे रिक्षा चालवणे अवघड झाले आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासन खड्डे बुजवत नाही. खड्डयांयांमुळे दररोज रिक्षा खराब होत आहेत. जितके पैसे कमावले तेवढे रिक्षाचा मेंटेनन्सला खर्च होतो, सीएनजीसाठी काशीमिऱ्याला जावे लागते, खड्डयांमूळे दिवस त्यातच जात असल्याचे रिक्षाचालकांनी सांगितले.
रिक्षा चालकांच्या विविध समस्यांबाबत नायगावच्या जूचंद्र नाक्याजवळ मंगळवारी सकाळी सहाशेहून अधिक रिक्षाचालकांचा सहभाग असलेल्या रिक्षामालक संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आले. सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत आंदोलन सुरू होते. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. यावेळी सहायक आयुक्त मनाली शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी संजय यादव, पोलीस अधिकारी उपस्थित होते. १५ दिवसांत खड्डे बुजवले जातील, असे मनाली शिंदे यांनी सांगितले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.