- आशिष राणेवसई - वसई-विरार शहरात सध्या कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. तर कचरा व्यवस्थापनासाठी अर्थात ओला - सुका कचरा वर्गीकरणासाठी महापालिकेने मोठा गाजावाजा करत देऊ केलेले निळे आणि हिरवे डबे तर सोसायटीच्या आवारात चक्क फुटलेल्या अवस्थेत दिसत असल्याचे चित्र सर्वच प्रभागात दिसते आहे. किंबहुना महापालिकेने वाटप केलेले ते निळे व हिरवे डबे आता फुटलेल्या स्थितीत असल्याने त्याचे ओला आणि सुका असे वर्गीकरण होणेच अक्षरश: थांबले असल्याने शहरात दुर्गंधी निर्माण झाली आहे. मात्र, यामुळे नागरिकांच्या आरोग्याप्रती पालिकेचे धोरण उदासीन असल्याचे समोर येत आहे.दरम्यान, पुन्हा निळे आणि हिरवे डबे मिळणार नाहीत अशी भूमिका महापालिकेने घेतल्याने आता याचा परिणाम शहरात दिसतो आहे. कचºयामुळे सर्वत्र दुर्गंधी आणि रोगराईला आमंत्रण मिळाल्याची सध्याची शहरातील अवस्था आहे. एकीकडे महापालिका सांगते की, आपला ओला आणि सुका कचरा वेगळा करून तो निळ्या आणि हिरव्या डब्यात टाकावा. पण, आज वसई - विरार शहरातील अनेक सोसायट्यांच्या तसेच चाळींच्या आवारातील कच-याचे हे डबे पूर्णपणे तुटलेलेच दिसतात. यामुहे कचरा जमिनीवर पडत असून नागरिकांना रोगराईला सामोरे जावे लागते आहे.वसई पश्चिमेस व पूर्वेस आणि पेल्हार भागात हे कचºयाचे डबे धूळ खात पडल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे महापालिका नागरिकांच्या आरोग्याबाबत व शहरातील स्वच्छतेबाबत किती जागरूक आहे, हे दिसून येत आहे.महापालिकेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरात मोठमोठ्या जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च करून नागरिकांना सुका कचरा निळ्या डब्यात तर ओला कचरा हिरव्या डब्यात टाकून कचरा वर्गीकरणाचे आवाहन केले. तत्कालीन आयुक्त सतीश लोखंडे यांनी तर यासाठी खास ‘महिला ब्रँड अँबेसेडर’ची नियुक्ती केली होती. या आवाहनानंतर शहरातील प्रत्येक प्रभागाप्रमाणे कचºयाच्या डब्याचे वितरण करण्यात आले. मात्र दोन वर्षांनी महापालिकेचे हे निळे आणि हिरवे डब्बे फुटले. या फुटक्या डब्यातून आता कचरा व घाणेरडे पाणी बाहेर पडत आहे.ही समस्या कुठल्याही एका प्रभागापुरती मर्यादित नाही, तर ती वसई, विरार, नालासोपाºयाच्या म्हणजेच ९ प्रभागात आणि त्यांच्या परिसरातील हजारो सोसायट्यांमध्ये निर्माण झाली आहे. यासंदर्भात असंख्य स्थानिकांनी महापालिकेकडे नवीन डबे पुरवण्याची मागणी केली असता पालिकेकडून नकार दिला जात आहे. आता डबे मिळणार नाहीत. त्याचे वाटप एकदाच केले गेले. काही करदाते वर्षभर तर कोणी सहा महिन्यांपासून महापालिका आणि स्थानिक लोकप्रतिनिधीकडे नवीन डब्याची मागणी करत आहेत. तरीही पालिकेने डबे पुरवलेले नाहीत.महापालिका काही महिन्यांपासून कचºयाचे डबेच नसल्याची भूमिका घेत असतानाच, दुसरीकडे मात्र पूर्व - पश्चिम आणि पेल्हारमध्ये कचºयाचे डबेच चक्क धूळखात पडल्याचे दिसले आहे.वसई पूर्वेकडे रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या एका मोठ्या गोडावूनमध्ये हे डबे दिसतात. तर दुसरीकडे पेल्हारच्या जलशुद्धी केंद्राच्या अडगळीच्या ठिकाणीसुद्धा हे निळे आणि हिरवे डबे कुणालाही दिसू नयेत असे ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे महापालिका जनतेची दिशाभूल करत असून शहरात रोगराईला आमंत्रण देत असल्याचा आरोप होत आहे. या संदर्भात आयुक्त आणि शहर अभियंता माधव जवादे यांना संपर्क केला असता ते जिल्हा नियोजन समिती च्या बैठकीत व्यस्त असल्याचे सांगितले.
कुठे गेल्या महिला ब्रँड अँबेसेडर ?तत्कालीन आयुक्त सतीश लोखंडे यांनी मोठा गाजावाजा करून स्वच्छ भारत अभियान मोहीम आणि शहरात प्रभाग निहाय ओला आणि सुका कचरा व्यवस्थापन तसेच वर्गीकरणासाठी आधी डबे वाटले. नंतर काही महिलांना महिलाना प्रभागनिहाय ब्रॅण्ड अँबेसेडर बनवले.काही काळ पालिकेचे स्वछता निरीक्षक आणि आरोग्य कर्मचारी प्रभागात फिरले. मात्र नंतर हे सर्वण गायब झाले. मग सर्वत्र आवाहन करून सभा बैठका घेण्यासाठी या महिला अँबेसेडर फिरताना आढळून आल्या. तत्कालीन आयुक्त लोखंडे गेले आणि या ब्रँड अँबेसेडरही शहरातून गायब झाल्या.कचरा वर्गीकरणाच्या नुसत्याच भूलथापानागरिकांना सुका कचरा निळ्या डब्यात तर ओला कचरा हिरव्या डब्यात टाकून कचरा वर्गीकरणाचे आवाहन केले होते. मात्र, आज हजारो हाऊसिंग सोसायट्यांमधील कचरापेट्या फुटलेल्या आणि तुटलेल्या अवस्थेत असल्याने एकाच कचरा पेटीत सुका व ओला कचरा टाकला जात आहे. कचरा वर्गीकरणाची मोहीम अपयशी ठरताना दिसते आहे.शहरातील निळे व हिरवे डबे तुटलेल्या अवस्थेत आहेत, याची पालिकेला कल्पना आहे. पुन्हा एकदा शहरातील हाऊसिंग सोसायटी आणि इतर विभागात त्यांची नावे टाकून त्या डब्याचे वाटप लवकरच केले जाईल. मात्र सोबत आपणच त्या डब्यांची जातीने देखभाल करून सक्तीने ओला व सुका कचरा गोळा करून त्याचे वर्गीकरण करायचे आहे. याबाबत आता माघार नाही. किंबहूना याबाबत एक संयुक्त बैठकही घेतली जाईल.- प्रवीण शेट्टी, महापौर, वसई विरार शहर महापालिका, मुख्यालय