- मंगेश कराळे नालासोपारा - विरारमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने स्वतःचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर टाकून शनिवारी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या तरुणाला विरार पोलिसांनी धमकावल्यामुळे आत्महत्या केल्याचा आरोप तरुणाच्या आईसह नातेवाईकांनी केला आहे.
पती-पत्नीच्या भांडणातील तरुणाला विरार पोलिसांनी टायरमध्ये टाकून मारण्याची व कोंबडा बनविण्याची तसेच जामीनसाठी वकील कोण मिळतो हे पाहतो असे सांगून धमकी दिल्यामुळे अभय पालशेतकर (२८) या तरुणाने घाबरून स्वतः बनविलेल्या व्हिडीओत बोलून तो व्हिडीओ सोशल मीडियावर टाकत शनिवारी सकाळी आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपवली आहे. संबंधित पोलिसांवर तत्काळ कारवाई करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केले आहे. घरगुती कारणावरून अभयच्या बायकोने अभय आणि त्याच्या आईविरोधात एन सी दाखल केली होती.
माझ्या मुलाला धमकी दिल्यामुळे त्याने आत्महत्या केली आहे. ज्या पोलिसामुळे आत्महत्या केली आहे त्याच्यावर कारवाई करून गुन्हा दाखल करत माझ्या मुलाला न्याय द्यावा ही माझी मागणी आहे. - उज्वला पालशेतकर (अभयची आई)
याप्रकरणी घरच्यांना अर्ज करण्यास सांगितले आहे. यात चौकशी करून जो पोलीस कर्मचारी दोषी असेल त्याच्यावर खातेनिहाय कारवाई करण्यात येईल. त्या तरुणाला पोलिसांनी मारहाण केलेली नसून फक्त धमकी दिलेली आहे. - जयंत भजबळे (पोलीस उपायुक्त, परिमंडळ तीन)