- नारायण जाधवलोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : निवासासाठी उत्तम असलेल्या देशभरातील १० लाखांपेक्षा जास्त वस्तीच्या शहरांमध्ये ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई, ठाणे व कल्याण-डोंबिवलीने बाजी मारली आहे. मात्र, केंद्रीय नागरी व्यवहार व गृह मंत्रालयाने यासाठी आखून दिलेल्या निकषांत ठाणे, कल्याण-डोंबिवलीने प्रामुख्याने तंत्रज्ञान, शहर नियोजन व एकंदरीत मनपाचे कामकाज, सोयीसुविधा यात मार खाल्ला आहे. आर्थिक कमकुवततेचाही फटका कल्याण-डोंबिवलीला बसला आहे. वसई-विरार मनपाचीही घसरगुंडी झाली आहे.
या यादीत देशातील पहिल्या दहा शहरांमध्ये पुणे दुसऱ्या तर नवी मुंबई सहाव्या क्रमांकावर आहे. ठाणे ११व्या तर, कल्याण-डोंबिवली १२व्या स्थानावर आहे. कल्याण-डोंबिवलीची कामगिरी गेल्या वर्षीपेक्षा सुधारली आहे. नवी मुंबई, ठाण्याचा दर्जा गेल्या वर्षापेक्षा यंदा घसरल्याने दोन्ही मनपांना आणखी मेहनत घ्यावी लागणार आहे. तंत्रज्ञानात मार खाल्ल्याने स्मार्ट सिटीत भाग घेतलेल्या या सर्व शहरांची घसरगुंडी झाली आहे. मीरा-भाईंदर, उल्हासनगर, भिवंडीची लोखसंख्या १० लाखांपेक्षा कमी असल्याने विचार झालेला नाही.
महानगराच्या पायाभूत सोयी, रस्ते, शिक्षणाच्या विशेषतः उच्चशिक्षण सुविधा वाढल्यात याबाबत शंका नाही; पण नागरिकांचे जीवनमान सुधारले का? याचे उत्तर नकारार्थी आहे. कारण पूर्वी इतिहासात ठाणे हे व्यापाराचे प्रमुख केंद्र होते. नंतर ते रोजगाराचे प्रमुख केंद्र म्हणून वागळे इस्टेट, पोखरण रोड नंबर दोन, घोडबंदर, कोलशेत रोड तसेच बाळकूम, माजिवडा, कळवा व पुढे बेलापूर पट्टी यात लाखो रोजगार उपलब्ध होते. हे सर्व छोटे-मोठे कारखाने बंद करून त्याच जागी निवासी संकुले उभी राहिली, त्यात राहणारे ठाण्यात नोकरी व रोजगार करत नाहीत, याअर्थाने या महानगरात रोजगाराच्या संधी कमी झालेल्या आहेत. बाहेरून विकसित दिसत असलेले महानगर जवळपास ४५० लोकवस्त्यांनी घेरलेले असून त्यात कमी उत्पन्न गटातील जनता राहत आहे. त्यांच्या श्रमावर या शहराचा गाडा सुरू आहे. या अल्प उत्पन्न गटातील असलेल्या जनतेची एकूण संख्या १०-१२ लाखांच्या पुढे आहे. यांचे जीवनमान घटलेले आहे, रोजगारही घटलेला आहे. याकडे डोळेझाक करून देशात आमचा ११ वा नंबर आला, अशी पाठ थोपटून घेण्यात आपणच आपली दिशाभूल करत राहू. - संजीव साने, स्वराज इंडिया
देशामध्ये बारावा क्रमांक आला आहे, ही निश्चितच चांगली बाब आहे. आजघडीला केडीएमसीच्या वतीने ओला आणि सुका कचरा वर्गीकरणावर विशेष भर दिला आहे. त्याविषयीच्या जनजागृतीला सामाजिक संस्थांचाही मोठा हातभार लागत आहे. वाहतूककोंडी हा विषय शहरातील महत्त्वाचा आहे. कल्याण-ठाणे रेल्वे समांतर रस्त्याचा विषयही गेली अनेक वर्षे ठोस अंमलबजावणीअभावी खितपत पडला आहे. त्यामुळे हा विषय लवकरात लवकर मार्गी लागला, तर निश्चितच प्रवासासाठी लागणारा वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे. शहरात विकासकामे जोमाने सुरू आहेत, ती विशिष्ट मुदतीतच मार्गी लागावी, ही अपेक्षा आहे.- नंदकुमार पालकर, दक्ष समिती सदस्य, डोंबिवली