वसईतील नवघर माणिकपूर शहरातील एच प्रभाग अंतर्गत दिवाणमान येथील अश्विन नगर मध्ये राहणाऱ्या एका ७० वर्षांच्या त्रस्त आजोबांनी पावसामुळे साचलेल्या पाण्याचा निचरा होत नसल्याने अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलं. गळ्यात फलक अडकवून महापालिका प्रशासनाविरोधात सोमवारी पाण्यात बसून ठिय्या आंदोलन करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
अशोक तलाजिया वय ७० राहणार आश्विन नगर,वसई असे या आंदोलनकर्त्यांचे नाव आहे. त्यांच्या सांगण्यानुसार,दरवर्षी पावसाळ्यात अवघ्या वसई नवघर माणिकपूर शहारासहित दिवाणमान स्थित आश्विन नगर भागातही गुडघ्याइतक पाणी साचून हे सर्व पाणी घरांत शिरते आणि यात घर, दुकाने व त्यातील किंमती वस्तूचे हजारो लाखोंचे नुकसान होते.
दरम्यान दरवर्षी सातत्याने हेच होत असताना पावसाच्या साचलेल्या पाण्याचा निचरा देखील नीट होत नसल्याने वैतागून आक्रमक होत त्यांनी भर रस्त्यात सोमवारी पावसाच्या पाण्यात ठिय्या मांडला असून महापालिकेचा ते निषेध करत आहेत. वसई-विरार शहरांमध्ये जरा वेळ ही पाऊस पडला तरी संबध, रस्त्यावर,घरात सोसायटीचे आणि व्यापारी संकुलात दुकानात मुख्य रस्त्यावर गुडघाभर पाणी साचते आणि हे पाणी दोन दोन -तीन तीन दिवस ओसरण्याचे नावदेखील घेत नाही. त्यामुळे दरवर्षाला घरातील लाखो रुपयांच्या सामानाची नासधूस होत असल्याचा गंभीर आरोप या आजोबांनी केला आहे. दरम्यान महापालिका लोकप्रतिनिधी यांच्याकडे वारंवार तक्रार करून सुद्धा कोणीही लक्ष देत नसल्याने अखेर कंटाळून अशोक तलाजिया यांनी पाण्यात बसून एक अनोखे आंदोलन केले.
यावेळी त्यांनी गळ्यात एक बॅनर घातला असून अश्विन नगर मधील जलभराव कधी थांबणार तर या जलभरावास वसई विरार महापालिकाच जबाबदार असल्याचा आरोपदेखील त्यांनी या बॅनरच्या माध्यमाने केला आहे.