- आशिष राणे
वसई- वसई-विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रास पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्याच्या जुन्या व नवीन पाणीपुरवठा योजनेच्या पंपाची व त्यांच्या पॅनलसहित इतर ही कामे पावसाळ्यापूर्वी करून घेणे आवश्यक असल्याने ही दुरुस्तीची कामे करण्याकरिता बुधवारी दि 2 जून रोजी सकाळी 9 वाजल्यापासून ते गुरूवार दि 3 जून सकाळी 9 वाजेपर्यंत सूर्या योजनेतून होणारा पाणी पुरवठा 24 तासांकरीता बंद राहणार असल्याचे पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे शहर अभियंता एम.गिरगावकर यांनी सांगितले.
दरम्यान दोन दिवसांच्या दुरूस्तीनंतर पुढील दोन दिवस शहरात पाणी पुरवठा कमी दाबाने अपुरा येण्याची शक्यता आहे. तर या काळात नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे व पालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.
नाईलाजाने वसईकरांना टँकरचे दुषित पाणी -
वसई-विरारकरांना पाणी पुरवठा करणार्या जलवाहिन्या अनेकदा नादुरुस्त होतात. पंम्पिंग स्टेशनमध्ये होत असलेल्या तांत्रीक बिघाडामुळे पालिकेकडून त्यांच्या दुरूस्तीचे काम हाती घ्यावं लागतं, तर दुरूस्तीच्या काळात वसईकरांचा पाणी पुरवठा काही तासांसाठी किंवा दिवसांसाठी बंद ठेवला जातो. या काळात अनियमित दराने अथवा अपुरा पाणीपुरवठा देखील वसईकरांना केला जातो. जलवाहिन्यांतून गढूळ पाणी येणे असे प्रकार वारंवार उद्भवत आहेत.
आधीच वसई-विरारमध्ये पाण्याची बऱ्यापैकी टंचाई सुरू आहे. बर्याच नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे त्यात सातत्याने जलवाहिन्यांत होणारे बिघाड व त्यावर पालिकेचे ठरलेले रडगाणे यामुळे वसईकरांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. नाईलाजाने वसईकरांना टँकरच्या दुषित पाण्याचा वापर करावा लागतो आधिच कोरोना, म्युकर मायकोसिस आणि त्यात हे दूषित व गढूळ पाणी त्यामुळे वसईकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.