लोकमत न्यूज नेटवर्कवसई : कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असताना कार्यालय गाठण्यासाठी दररोज तासन्तास प्रवासात वेळ घालवणारे वसई-विरारकर आता मानसिक आजारांचे बळी पडू लागले आहेत. वसई ते घोडबंदरदरम्यान काशिमीरा आणि दहिसर चेकनाका येथील वाहतूककोंडीत सापडणारे नागरिक ठरावीक वेळेत कार्यालयात पोहोचू शकत नाहीत. यामुळे अनेकांना रोजगार गमावण्याचीही भीती वाटू लागली आहे.
मुंबई-अहमदाबाद या वसई-विरारमधून जाणाऱ्या महामार्गावरून मुंबई, भिवंडी आणि ठाण्याच्या दिशेने रोज ये-जा करताना येथील नोकरदारांना कामण, भिवंडी व कल्याण आदी भागात होत असलेल्या वाहतूककोंडीचा दररोज सामना करावा लागत आहे. यामुळे नित्यनेमाने कामावर लेटमार्क लागणे, नोकरीच्या ठिकाणी ताण वाढणे, असुरक्षितता वाटणे अशा कारणांनी अनेकांना ग्रासले असून नोकरी जाण्याची भीती आता वाटू लागली आहे.मुंबई, ठाण्यातील खासगी कंपन्या सुरू असल्याने वसई, विरार, नालासोपारा, नायगाव आदी भागांत राहणारे हजारो कामगार हे खासगी वाहनांनी मुंबई आणि ठाणे गाठू लागले आहेत. मात्र, या परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. त्यामुळे कामगारांना दररोज तीन ते चार तास वाहतूककोंडीत घालवावे लागत आहेत. त्याचा प्रतिकूल परिणाम या नोकरदारांच्या कामावर होऊ लागला आहे.
मालाड येथील मल्टीनॅशनल कंपनीमध्ये सिनीअर ग्राफिक्स डिझायनर म्हणून काम करत असलेली तरुणी व तिच्या सहकारी टीमने आपली व्यथा मांडली. आम्ही रविवार सोडून सहा दिवस कार्यालयात काम करतो, मात्र घरून काम होत नाही. याउलट ५० टक्केच पगार मिळतो, तर कार्यालयाच्या ठिकाणी काम केले तर पूर्ण पगार मिळतो, मात्र दुर्दैवाने याच कार्यालयात पोहोचण्यासाठी सकाळी बसेसची व्यवस्था नाही. वसई-विरारमधून रिक्षाने एकावेळी ५०० रुपये होतात. वसईतून मुंबई उपनगर येथे जाण्यासाठी बसेसची कुठलीच व्यवस्था नाही. त्यामुळे केवळ खाजगी मोटार व रिक्षा हे दोनच पर्याय आहेत, मात्र ते खर्चिक आहेत आणि ते सुद्धा वेळेवर मिळत नाहीत. त्यासाठीही बरीच गर्दी असते. गाडी असेल तरीही रांगेत साधारण अर्धा तास लागतो. त्यानंतर महामार्गावरील वाहतूककोंडीतून सुटका होऊन कसेबसे कार्यालयात पोहोचतो, असे त्या म्हणाल्या.मी वसई ते लोअर परेल मोटारीने प्रवास करतो. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. दररोज पेट्रोलवर होणाºया खर्चामुळे अतिरिक्त ताण वाढला आहे. शिवाय, कामावर पोहोचण्यास उशीर होत असल्यामुळे कामाच्या ठिकाणी जी नोकरकपात व पगारकपात सुरू आहे, त्यात आपले तर नाव पुढे नसेल ना, याचीच रोज चिंता सतावत राहते.- सतीश सुळे, वसई