विरार - काेराेनामुळे घेतलेल्या लाॅकडाऊनच्या काळात एप्रिल ते ऑक्टाेबर या सात महिन्यांत वसई-विरारकरांनी वसई-विरारमधील शिधावाटप दुकानांतून विक्रमी तीन लाख ८२ हजार क्विंटल धान्याची विक्री झाली. शिधावाटप केंद्रातून प्रथमच ९५ टक्के एवढी धान्यविक्री झाली आहे.वसई-विरार शहरांत साडेतीन लाख शिधापत्रिकाधारक आहेत. तर १९० शिधावाटप दुकाने आहेत. मार्चमध्ये काेरोनाचा संसर्ग सुरू झाला आणि सरकारने लॉकडाऊन घेतला. या काळात लोकांचे रोजगार बुडाले आणि आर्थिक परिस्थिती बिकट बनली. त्यामुळे नागरिकांनी शिधावाटप दुकानांत मिळणारे धान्य घेण्यास गर्दी केली हाेती. एप्रिल ते ऑक्टोबरमध्ये वसईच्या पुरवठा खात्याने एक लाख ७७ हजार ६०४ क्विंटल धान्य शिधावाटप दुकानांत उपलब्ध केले होते. त्यापैकी एक लाख ६९ हजार ६७३ क्विंटल धान्य लोकांनी घेतले. केंद्र शासनाच्या योजनेनुसार एक लाख ८१ हजार २६१ क्विंटल धान्य देण्यात आले होते. त्यापैकी एक लाख ७४ हजार ५४२ क्विंटल धान्य नागरिकांनी घेतले. नियमित आणि केंद्र शासनाचे मिळून तीन लाख ८२ हजार १०८ क्विंटल धान्य नागरिकांसाठी देण्यात आले होते. त्यापैकी तीन लाख ६७ हजार ४५७ क्विंटल धान्य नागरिकांनी घेतल्याची माहिती पुरवठा शाखेने दिली.बायोमेट्रिकद्वारे धान्यवाटप शासनाकडून अंत्याेदय योजनेसाठी १० किलो गहू आणि २५ किलो तांदूळ तर प्राधान्य योजनेसाठी प्रतिसदस्य गहू दोन आणि तांदूळ तीन किलो मिळतो. काळाबाजार रोखण्यासाठी शासनाने बायोमेट्रिक पद्धत लागू केली. शिधावाटप दुकानांत हे बायोमेट्रिक यंत्र बसविले. या पद्धतीने धान्य घेण्याचे प्रमाण ८५ टक्के वाढले. त्यामुळे लाभार्थ्यांना हिश्शाचे धान्य मिळत असल्याचे पुरवठा विभागाने सांगितले.टाळेबंदीच्या काळात नागरिकांची आर्थिक अडचण लक्षात घेऊन शासनाने धान्यपुरवठा वाढविला होता. प्रथमच विक्रमी ९५ टक्के धान्यवाटप करण्यात आले.- रोशन कापसे, पुरवठा अधिकारी, वसई
लॉकडाऊनमध्ये ‘रेशनिंग’चा वसई-विरारकरांना आधार! तीन लाख ८२ हजार क्विंटल धान्यवाटप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 2:55 AM