वसई - डिसेंबर महिना आला की वसईकर नाताळ सणाची मोठ्या आतूरतेने वाट पाहू लागतात.वसईच्या पश्चिम पट्टयात आठवडाभर आधीच नाताळ सणाचे वेध लागलेले असतात. विविध जाती -धर्माचे लोक वर्षानुवर्ष वसईत गुण्या गोवींदाने रहातात. सण कोणत्याही धर्माचा असला तरी प्रत्येकजण एकमेकांच्या सणांत, सुखदु:खात सहभागी होत असतात. हिंदूचा गणपती, दिवाळी सण तर मुस्लिमांचा रमझान, बकरी ईद आण ख्रिश्चनांचा नाताळ सण वसईत मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरे करीत असतात.नाताळ सणानिमित्त केल्या जाणाऱ्या खरेदीसाठी ख्रिस्ती बांधवांची सोमवारी धावपळ पहायला मिळत होती.वसईत अनेक पुरातन व नवीन चर्च आहेत. त्यांची साफसफाई व रंगरंगोटी झाली असून त्यावर नयनरम्य विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. घरांसमोरील ख्रिसमस ट्री आकर्षक सजावटीसह सुशोभीत केले गेले आहेत.वसईतील नाताळनिमित्त ख्रिस्ती बांधव आपल्या अंगणात नाताळगोठा सजवीत असतात. अनेक ठिकाणी तलाव, बावखले व मोकळ्या जागी येशूच्या जन्मसोहळ्यावर आधारीत मोठ्या स्वरूपात चलचित्र स्वरूपातील देखावे बनविले जातात. काही ठिकाणी या नाताळगोठांच्या स्पर्धाही आयोजित केल्या जात असतात.वसई -विरारमध्ये नाताळ सणासाठी बाजारात मोठी झुंबड उडालेली होती. विविध आकाश कंदील, चांदण्या व रोषणाईने बाजार फुलले होते. वसईत नाताळ सणानिमित्त घरोघरी लाडू, करंजी, केक असा फराळ बनवला जातो. हा सण वर्षभरातील महत्वाचा असतो. डिसेंबरची थंडी, प्रभू येशूचा जन्मसोहळा व सरत्या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यासोबत नवीन वर्षाचे स्वागत करणे म्हणजे एक पर्वणीच. त्यामुळे नाताळ सणाच्या कालावधीत लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वचजण एका वेगळ्याच उत्साह व जल्लोषात असतात. नाताळ सणाचे मुख्य आकर्षण म्हणजे शुभ्र दाढीवाला सांताक्लॉज. सध्या बाजारात या सांताक्लॉजचे वेश परीधान करण्यासाठी व नवीन कपडे खरेदीसाठी लहानग्यांची पालकांसोबत दुकानात झुंबड उडू लागली आहे. परगावी कामानिमित्त गेलेला वसईकर या नाताळ सणानिमित्त आठवडाभर अगोदरच रजा टाकून आपल्या नातलगांसोबत सण साजरा करण्यासाठी आलेला आहे. वसईच्या पश्चिम पट्टयात ख्रिस्तधर्मीय मोठ्या प्रमाणात असल्यीमुळे पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा केला जातो.दरवर्षी हा वसईतला नाताळ अनुभवण्यासाठी वसईबाहेरून पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात.गोव्यापाठोपाठ वसईत मोठ्या प्रमाणात ख्रि स्ती बांधव नाताळ सण साजरा करतात. सुशोगात वसईत डिसेंबरमध्ये गुलाबी थंडी सुरू झाली की वेध लागतात ते प्रभू येशूच्या जन्मदिवसाचे अर्थात नाताळ सणाचे. वसई धर्मप्रांतात पालघर जिल्ह्यातील ३६ धर्मग्रामांमधून नाताळची महिनाभर अगोदर तयारी सुरू होते. नाताळच्या आगमन काळाचा विधीही या धर्मग्रामांमधील चर्चेसमधून दर रविवारी सुरू होतात, आणि गुलाबी रंगाच्या मेणबत्त्या पेटवल्या की लाडक्या येशूबाळाचा जन्मोत्सव सुरु होतो.ख्रिसमसची सुरुवात होते, एक महिना आधीखर तर नाताळची सुरूवात महिनाभर अगोदरच होत असल्यामुळे त्याला आगमन काळ असेही म्हटले जाते. आगमन काळात अध्यात्मिक तयारी पूर्ण केल्यानंतर २४ डिसेंबरला रात्री मुख्य प्रार्थना केली जाते. त्यानंतर बायबलमधील प्रभू येशूच्या जन्माचा वृत्तांत चर्चमध्ये वाचला जातो.धर्मगुरू शांती, एकात्मता याचे संदर्भ देऊन मार्गदर्शन करतात. त्यानंतर नाताळगोठ्यातील बाळ येशूला वंदन, धूपारती करून नाताळ सणाच्या सेलीब्रेशनला सुरूवात केली जाते. हा सोहळा पहाटेपर्यंत सुरू असतो.
वसईत सर्वत्र नाताळचे सेलिब्रेशन सुरू, खरेदीला उधाण, सांताच्या आगमनाने बच्चेकंपनी खूश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 2:33 AM