लोकमत न्यूज नेटवर्कवसई : आजच्या मोबाईल युगात सेल्फी वेडी तरुणाई कुठेही कसलेही भान न बाळगता जीवाला धोका पत्करून सेल्फी काढण्यात दंग होतात आणि आपला जीव गमावून बसतात. त्यांना सावध करण्यासाठी सोमवंशी क्षत्रिय समाज संघाचे अध्यक्ष विलास चोरघे यांनी अ़र्नाळा समुद्रकिनारी सावधानतेचे फलक लावले आहेत. खऱ्या अर्थाने पावसाळा सुुरु झाले आहे. डोंगर कपारीतून धबधबे, नदीनाले वाहू लागले आहेत. उधाण आलेला समुद्र फेसाळून किनाऱ्यावर धडकू लागला आहे. अशा वातावरणात सहलीचा उत्साह ओसंडून वाहू लागला आहे. आजची मोबाईलवेडी तरुणाई बेफामपणे आनंद लुटू पाहत आहे आणि त्यातूनच अपघात घडून जीव जात आहेत. म्हणूनच सेल्फी वेड्यांना सावध करण्यासाठी सहलीच्या ठिकाणी फलक लावण्याची गरज असल्याचे चोरघे यांचे म्हणणे आहे. २८ जून १७ रोजी मरीन ड्राई्व्ह येथे प्रिती पिसे हिने सेल्फीच्या वेडापायी जीव गमावला. सेल्फीच्या नादापायी १९ जानेवारी २०१६ रोजी बँडस्टँड समुद्रात पडून तरन्नुमचा जीव गेला. ८ आॅक्टोबर २०१६ रोजी अग्नील पायरीस याचा लोणावळा येथे पाय घसरून दरीत कोसळून मृत्यु झाला. सेल्फी काढताना मोहम्मद शाबीत खान याचा ४ नोव्हेंबर २०१६ रोजी मीरा रोड येथे लोकलची धडक बसल्याने मृत्यु झाला होता. फेब्रुवारी २०१७ मध्ये सर्पमित्र सोमनाथ म्हात्रे याचा बिषारी सापासोबत सेल्फी घेताना सापाने दंश केल्याने मृत्यु झाला होता. तर मे २०१७ रोजी मोनाक्षी राजेश हिचा बँडस्टँड समुद्रात सेल्फीच्या नादापायी मृत्यु झाला होता. त्यानंतरही जीवावर उदार होऊन तरुणाई सेल्फी काढताना दिसत आहे. म्हणूनच चोरघे यांनी अर्नाळा समुद्रकिनारी फलक लावून कळकळीचे आवाहन केले आहे. सहलीसाठी जाणाऱ्या मित्र-मैत्रिणींनो आयुष्य खूप सुंदर आहे. क्षणिक आनंदासाठी ते संपवू नका. काळजी घ्या. घरी आपली कोणीतरी वाट पहात आहे, असे आवाहन चोरघे यांनी फलकांमधून केले आहे.
सेल्फीवेड्या तरुणाईसाठी वसईत जनजागृती मोहीम
By admin | Published: July 03, 2017 5:54 AM