आशिष राणे
वसई - अब दिल्ली दूर नहीं हा राजकारणातील शब्द एका गंभीर घटनेमुळे अब वसई दुर नही असा झाला असून दिल्लीत राहणाऱ्या व ऑनलाइन अभ्यासावरून आई रागावली म्हणून घर सोडून थेट वसई गाठण्याऱ्या त्या केवळ १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला वसईतील त्या रिक्षाचालकाने दाखवलेल्या सतर्कता व संवेदनशीलतेमुळे पालकांच्या स्वाधीन करता आले आहे. त्यामुळे अभिनंदनास पात्र अशा प्रामाणिक रिक्षाचालकांसोबत वसई वाहतूक शाखेचे पोलीस आणि माणिकपूर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या संदर्भात माणिकपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,दि. २९ रोजी सकाळी १०.३० वाजता वसई पूर्व रेल्वे स्टेशन भागात रिक्षाचालक राजू करवाडे हे त्यांची प्रवासी रिक्षा घेऊन जाताना तेथे १४ वर्षाच्या मुलीने हात दाखवला असता रिक्षाचालकांनी रिक्षा थांबवली. त्यावेळी मुलीने विचारले की, मला या भागाची माहिती नाही मला राहण्यासाठी भाड्याने कुठे रूम मिळेल का त्यावर रिक्षाचालक राजू करवाडे यांनी तिचे नाव व ओळखपत्र विचारले असता तिने सांगितले की ती एकटी दिल्ली वरून वसईत आलेली आहे.
तेव्हा राजू याने तिचे ओळखपत्र बघितले असता रिक्षा चालकास लक्षात आले की, ही मुलगी खरे बोलत असून ती अल्पवयीन देखील आहे. त्याचवेळी रिक्षाचालक राजू करवाडे यांनी सतर्कता दाखवून वसई वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार राकेश लोहकरे यांना संपर्क साधला असता वाहतूक पोलीसांनी रिक्षाचालकास त्या मुलीला माणिकपूर पोलीस ठाणे येथे घेऊन जाण्यास सांगितले.
दरम्यान रिक्षाचालक राजू करवाडे हे त्या मुलीला पोलिस ठाण्यात घेऊन आले त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या पोलीस नाईक विकास ताकवाले यांनी सदर मुलीचे नाव व पत्ता याची खात्री करून दिल्ली येथील साकेत पोलीस स्टेशनला संपर्क साधला. त्यातही माहिती पमिळाली की ही अल्पवयीन मुलगी १४ वर्षे वयाची असून नवी दिल्ली सेक्टर ०७ पुष्प विहार येथे राहते. मात्र, आईने अभ्यासावरून रागावल्याने ही मुलगी घरातून दि २८ जानेवारी रोजी रागाच्या भरात निघून आली आहे. त्याबाबत साकेत पोलीस ठाणे दिल्ली येथे अपहरणाचा गुन्हा दाखल असल्याचे समजले.
परिणामी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना कल्पना देत माणिकपूर पोलिसांनी तात्काळ दिल्ली येथील पोलीस स्टेशन व त्या मुलीच्या वडिलांशी संपर्क साधून त्यांची मुलगी वसईत मिळून आल्याबाबत माहिती दिल्याने तात्काळ शनिवारी त्या मुलीचे आई वडील दिल्ली वरून दुपारच्या विमानाने तिला घेण्यासाठी मुंबईला रवाना झाले व तद्नंतर माणिकपूर पोलीस स्टेशन येथे येऊन आपल्या मुलीला ताब्यात घेतले.
त्यावेळी सर्वप्रथम मुलीच्या पालकांनी रिक्षाचालक राजू करवाडे सहित वाहतुक पोलिस लोहकरे तसेच माणिकपूर पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आहेर पोलिस अंमलदार यांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली अर्थातच रिक्षाचालक राजू यांच्या सतर्कता व संवेदनशीलतेमुळे ही मुलगी मिळून आली व तिला पालकांच्या स्वाधीन करता आले. अन्यथा या मुलीचा थांगपत्ता मिळू शकला नसता अशी चिंता पालक व पोलिसांनी व्यक्त केली यावेळी रिक्षा चालक राजू यांचा वाहतूक व माणिकपूर पोलिसांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.