आशिष राणे
वसई - कोरोनाचे संकट,मनाई हुकूम व टाळेबंदी असताना देखील वसई प्रांताधिकारी कार्यालयाच्या दिशेने रॅली, फलकबाजी, गर्दी करीत वसई तहसीलदार व प्रांताधिकारी यांच्या अकार्यक्षम कारभाराबाबत नानाविध प्रश्न उपस्थित करून या दोघावर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांची त्वरित बदली करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी सकाळी 10.30 वा च्या सुमारास शिवसेना,मी वसईकर अभियान आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेते व शेकडो कार्यकर्त्यांनी पालघर जिल्हाधिकारी यांच्या मनाई आदेशाचा भंग करून आंदोलन केल्याप्रकरणी वसई पोलिस ठाण्यात शेकडों कार्यकर्त्यांवर विविध कलमानव्ये गुन्हा दाखल केला असल्याची माहिती वसई पोलीस निरीक्षक अनंत पराड यांनी लोकमत ला दिली.
या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मी वसईकर ,शिवसेना व प्रहार जनशक्ती पक्ष आदी शेकडो कार्यकर्त्यांनी एन कोरोनाचे संकट व शहरात रूग्ण वाढत असताना वसई तहसीलदार किरण सुरवसे व वसई प्रांताधिकारी स्वप्नील तांगडे हे दोघे ही अधिकारी प्रशासन व्यवस्थित चालवत नसून कोरोनाची एकूणच परिस्थिती सर्वबाजून हाताळण्यास अकार्यक्षम ठरले आहेत, असा आरोप करीत या दोघाची शासनाने चौकशी वजा शिस्तभंगाची कारवाई करून त्यांची तात्काळ बदली करण्यासाठी शहरात लॉकडाऊन जरी कशी प्रमाणात शिथिल केला असला तरी देखील जमावबंदी आदेश झुगारून पायी रॅली,फलक बाजी आदी नाट्यमय रित्या आंदोलन केलें.
याउलट वसई पोलिसांनी या तिन्ही पक्षाला याबाबत रस्त्यावर गर्दी जमाव न करता सोशल डिस्टनसिंग पाळण्यात येऊन केवळ चार जणांच्या वतीनं निवेदन देण्यास सांगितले होते, मात्र तो ही आदेश झुगारून या तिन्ही पक्षाच्या नेते व शेकडो कार्यकर्त्यांनी पालघर जिल्हाधिकारी यांचा मनाई आदेशाचा भंग करून शुक्रवारी वसई गावात आंदोलन केले.दरम्यान या आंदोलना प्रसंगी शिवसेनेचे प्रमोद दळवी,मी वसईकर अभियानचे मिलिंद खानोलकर व प्रहार जनशक्तीचे हितेश जाधव आदींनी वसई तहसीलदार व प्रांताधिकारी यांच्याबाबात तक्रारींचा पाढा वाचला यात सरकारी रेशन धान्य घोटाळा,सामान्य नागरिकांची लूट,नियोजन शून्य कारभार, ई पास व प्रवासी घोटाळा, मजूर प्रवाशी यांची आर्थिक लूट,तसेच कोरोना अथवा विविध शासकीय योजना व त्या राबविण्यात सपशेल अकार्यक्षमता आल्याचा उहापोह ही वेळी करण्यात आला.
परिणामी या सर्व घडामोडींबाबत वसईत शांतता भंग झाली तसेच रस्त्यावर गर्दी करून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढविण्याची जाणीव असतानाही रस्त्यावर नियम तोडून रॅली काढली म्हणून अखेर फिर्यादी पोलीस शिपाई प्रफुल सरगर यांनी वसई पोलीस ठाण्यात गुन्हा रजि क्रं.262/2020 भा द संहिता कलम 188,आपत्ती व्यवस्थापन अधि.2005 चे कलम 51(ब) तसेच भारतीय साथ रोग नियंत्रण अधि.1987 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
आम्हाला आंदोलनकर्त्यांनी पत्र दिले त्यावेळी आम्ही आंदोलन कर्त्याना सांगितले की आपण केवळ चार जण निवेदन द्या,मात्र त्यास ही न जुमानता या मंडळीनी रॅली, फलकबाजी आदी आंदोलन केले,त्यानुसार कायदा मोडला म्हणून जवळपास 80 ते 90 कार्यकर्त्या वर वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे - पोलीस निरीक्षक अनंत पराड, वसई पोलिस ठाणे, वसई गाव