आशिष राणेवसई : मुर्शिदाबाद स्विमिंग असोसिएशन तथा स्विमिंग फेडरेशन बंगालतर्फे७६ वी लाँंगेस्ट नॅशनल ओपन स्विमिंग ही बंगालच्या भागीरथी नदीच्या पात्रात तब्बल १९ कि.मी. अंतर पोहण्याच्या स्पर्धेचे आयोजन २५ आॅगस्ट रोजी करण्यात आले होते. ती साठी भारतातील व भारताबाहेरील अशा एकूण निवडक ३५ स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. विशेष म्हणजे त्यात पालघर जिल्ह्याच्या वसई तालुक्यातील तीन स्पर्धकांचा समावेश होता.
अभिमानाने सांगायचे झाले तर यामध्ये शार्दुल विद्याधर घरत रा.कळंब, वसई, राकेश रवींद्र कदम रा.वसई आणि कार्तिक संजय गुगले रा.वसई या वसईत राहणाऱ्या तिघा स्पर्धकांनी भागीरथी पात्राचे हे एकूण १९ कि.मी.चे अंतर अवघ्या २ तास ४० मिनिटात पूर्ण करून या स्पर्धेत त्यांनी विक्रम नोंदवला. या तिघा स्पर्धकांनीही आव्हानात्मक जलतरण स्पर्धा सलग दुसऱ्यांदा पूर्ण केली आहे. आता या तिघांनी या यशावर न थांबता पुढील वाटचाल इंग्लंड व आयरिश चॅनल खाडी सांघिक (रिले) पद्धतीने पार करण्याची तयारी राष्ट्रपती पुरस्कार विजेते प्रभात राजू कोळी यांच्या नेतृत्वाखाली सुरू केली आहे. सप्टेंबर- २०२० मध्ये ते या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
पालघर जिल्ह्यातील समस्त कोळी बांधव व वसई तालुक्यातील पश्चिम भागातल्या समुद्र किनारी वसलेल्या कळंब ग्रामस्थांकडून या तिघांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा तर मिळत आहेतच मात्र सातत्याने त्यांना या गावातून प्रोत्साहनही मिळत आहे ही बाब नक्कीच कौतुकास्पद आहे. यासाठी समाजातील दात्यांनी त्यांना मदतीचा हात दिल्यास उत्तम होईल.