- आशीष राणे वसई : अनधिकृत बांधकामे व पाण्याच्या नैसर्गिक निचऱ्याच्या मार्गावर झालेली अतिक्रमणे यामुळे वसईत दरवर्षी पूरसदृश स्थिती निर्माण होत असल्याची ओरड होत असतानाच आता वसई-नालासोपारा पश्चिमेकडील सुमारे पंधराशे एकर मोकळ्या जमिनीवर एक विस्तीर्ण उद्योग केंद्र निर्माण करण्याचा घाट घातला जात आहे. मात्र यास वसईतून जोरदार विरोध होण्याची चिन्हे दिसू लागली असून विविध गावांतील पावसाळी पाणी सामावून घेण्याची क्षमता असलेल्या सदरच्या या जागेवर कोणत्याही बांधकामाला परवानगी न देता हा भाग ‘ना विकास क्षेत्र’ म्हणून राखीव ठेवण्याची महत्त्वपूर्ण मागणी वसईकरांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.वसई-नालासोपारा पश्चिमेकडील सुमारे पंधराशे एकर मोकळी सरकारी जागा आहे. अगदी सोपारापासून गास, सनसिटी ते वसईपर्यंतचा हा विस्तीर्ण भूभाग आहे. परंतु ही भली मोठी विस्तीर्ण जागा राज्य शासनाने १९५० च्या दशकात मे.गोगटे सॉल्ट कं. यांना मिठाच्या उत्पादनासाठी भाडे पट्ट्यावर (लीज बेस) दिली होती. मात्र काही वर्षांपूर्वीच हा करार संपला असल्याची माहिती मिळते आहे.या शेकडो एकर जागेतून वसई तालुक्यातील गास, सोपारा, निर्मळ, वाघोली, नवाळे, सालोली, सांडोर, चुळणे, दिवाणमान, भुईगाव, गिरीज, आचोळे, नालासोपारा शहर आधी गावातील पावसाळी पाणी जाते. पावसाळ्यात या जागेला खाडीचे स्वरूप प्राप्त होते. या जागेच्या आजूबाजूला अनेक स्थानिक शेतकऱ्यांच्या छोट्या मोठ्या जमिनीदेखील असून या ठिकाणी भातशेती व बागायती शेती केली जाते.‘हरित वसई’ची अभयारण्य उभारण्याची मागणी! -मार्कुस डाबरेसंबंधित जागा राज्य शासनाने ताब्यात घेऊन त्यावर अभयारण्य उभारण्याची मागणी हरित वसई संरक्षण समितीचे अध्यक्ष मार्कुस डाबरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे यापूर्वीच केली आहे. ते सांगतात की, अंबाडी रोड रस्त्यामुळे आधीच पर्यावरणाचे मोठे नुकसान झालेले असताना ज्या खार जमिनीतून हा रस्ता केला आहे, ती जागा पूर्वी उत्कृष्ट प्रतीच्या चिंबोरी जातीच्या मासळीसाठी प्रसिद्ध होती. इथे भरतीचे पाणी सर्वदूर पसरत असल्याने पूर्वी या जागेत सैबेरिया व आॅस्ट्रेलिया आदी खंडातील पक्षी स्थलांतर करीत असत. वसईचे हे वैभव आता लयास गेले असून या भागातील उरलेसुरले प्राणी, वनस्पती जीवन नष्ट होऊ नये म्हणून वरिष्ठ पातळीवर पुन्हा प्रयत्न व्हायला हवेत, तर राज्य सरकारने ही जागा त्वरित ताब्यात घेऊन या परिसरात ‘हरित वसई’ अभयारण्यात त्याचे रूपांतर करावे, असेही डाबरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट म्हटले आहे.काय उभे राहणार या जागेवर?मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सच्या धर्तीवर या जागेवर मोठे उद्योग केंद्र उभारले जाणार असून यामध्ये हेल्थकेअर सिटी, एज्युकेशन सिटी, मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटल्स, थीम पार्क अशी आलिशान सिटी होण्यासाठी वरिष्ठ पातळीवर जोमाने प्रयत्न सुरू झाले आहेत.स्थानिकांच्या वेदनांशी देणे-घेणे नाही!ज्यांना या ठिकाणी मोठे उद्योग केंद्र उभारायचे आहे त्यांना केवळ पैसा कमवायचा आहे. त्यांना स्थानिक जनतेच्या वेदनांशी काही देणे-घेणे नाही, तर या विस्तीर्ण जागेत बांधकामाला परवानगी दिल्यास केवळ गावच नाही तर संपूर्ण वसईचा पश्चिम पट्टा उद्ध्वस्त होऊन हाहाकार माजेल असे चुळणे स्थित जागृती संस्थेचे जॅक गोम्स यांनी सांगितले.काय आहे धोका?भौगोलिक रचनेनुसार गास, सोपारा, चुळणे, आचोळे तसेच लगतची गावे ही समुद्रसपाटीपासून खालच्या स्तरावर आहेत. या सर्व गावातील पावसाळी पाण्याचा निचरा होऊन हे पाणी या जागेत येऊन साठते. त्यामुळे पावसाळ्यात या जागेला खाडीचे स्वरूप येते. त्या जागेवर बांधकामास परवानगी देणे म्हणजे वसईच्या हिरव्यागार पश्चिम पट्ट्याला कडेलोटाच्या उंबरठ्यावर नेण्यासारखे आहे, असे माजी नगरसेविका जोस्पिन फरगोज यांनी सांगितले.स्थानिक व पर्यावरणप्रेमींचा विरोध : केंद्र सरकारच्या मालकीच्या मात्र अजूनही गोगटे सॉल्ट कंपनीच्या ताब्यात असलेल्या या १५०० एकर जागेवर आलिशान सिटी उद्योग केंद्र तयार होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आता स्थानिक पातळीवरून विरोध सुरू झाला आहे. पश्चिम भागातील अनेक गावांतील पाणी साठवून घेण्याची क्षमता असलेल्या या विस्तीर्ण जागेवर टोलेजंग बांधकाम झाल्यास वसईच्या पश्चिम पट्टा पूर्णत: उद्ध्वस्त होईल, अशी भीती व्यक्त होत आहे. या संदर्भात वसई-विरार महापालिकेच्या माजी नगरसेविका जोस्पीन फरगोज यांनी ही जागा ‘ना विकास क्षेत्र’ म्हणून राखीव ठेवण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
वसईत विस्तीर्ण उद्योग केंद्र?; स्थानिकांचा बांधकामास तीव्र विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2020 11:04 PM